केएसएचे नियोजन : स्पर्धांसाठी शाहू स्टेडियम सर्व बाजूंनी सज्ज, दक्षतचे उपाय योजले जाणार
संग्राम काटकर/कोल्हापूर
यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी केएसएकडे वरिष्ठ गट फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तमाम फुटबॉलप्रेमींचे आता हंगामाचा किकऑफ कधी होतोय याकडे लक्ष लागले आहे. केएसएनेही छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल हंगामाचा किकऑफ करण्याची तयारी ठेवली आहे. केएसएचे पेट्रन-इन-चिफ श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही फुटबॉल खेळाडू व प्रेक्षकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घेऊनच स्पर्धा आयोजन केले जावे, असे केएसए पदाधिकाऱयांना सांगितले आहे. दुसरीकडे कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे निर्बंध शिथिल होताच फुटबॉल हंगामाचा किकऑफ होईल, असे स्पष्ट संकेत केएसएचे सचिव माणिक मंडलिक यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे तब्बल 22 महिने कोल्हापूरी फुटबॉल हंगाम थांबला आहे. त्यामुळे संघांची सरावापासून ते अगदी संघ बांधणीसाठी आवश्यक असलेली आर्थिक घडीही विस्कटली आहे. शिवाय संघांवर पैसे खर्च करण्यासाठी स्पॉन्सररही मिळाले नाहीत. अनेक खेळाडूंनी तर कोरोनामुळे फुटबॉल हंगाम होणार नाही, असे गृहीत धरुन सरावच बंद केला. अशा सगळया विचित्र परिस्थितीतच काही महिन्यांपूर्वी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशननेही कोरोनाची परिस्थिती पाहून फुटबॉल स्पर्धा आयोजन करण्याचे आवाहन केले. याबाबतची माहिती केएसएकडून संघांपर्यंत पोहोचवली गेल्यानंतर मात्र खेळाडूंनी मरगळ झटकून सरावाला सुरुवात केली.
त्याची माहिती घेऊन गेल्याच महिन्यात केएसएने सर्व संघांची बैठक बोलावून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जारी केलेले निर्बंध शिथिल केल्यास कोणत्याही क्षणी फुटबॉल हंगामाचा किकऑफ केला जाईल, असे सांगितले. तसेच हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकत केएसएने अलीकडेच खेळाडू नेंदणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्याला प्रतिसाद संघांनी खेळाडूंची केएसएकडे नोंदणी केली. खेळाडूंची नोंदणी झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून कोरोना व ओमिक्रॉनच्या संसर्गाचे रुग्ण आढळू लागल्याने जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी करत 14 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही खेळाची स्पर्धा अधिकृतपणे आयोजित करता येणार नाही, असे निर्बंध जाहीर केले आहेत.
दुसरीकडे केएसएनने निर्बंधाचे उल्लंघन करुन छत्रपती शाहू स्टेडियमवर वरिष्ठ फुटबॉल संघांच्या स्पर्धा आयोजित न करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. शिवाय 14 फेब्रुवारीनंतर कोरोनाचा संसर्ग धोका कमी होऊन शासनाने निर्बंध शिथील केल्यास फुटबॉल हंगामाचा किकऑफ करण्याचे केएसएने पाऊल उचलले आहे. इतकेच नव्हे तर सामान्यांसाठी छत्रपती शाहू स्टेडियम सर्व बाजूंनी सज्ज ठेवले आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेले निर्बंध केव्हा शिथिल होऊन फुटबॉल हंगामाला प्रारंभ होतोय याची आस केएसएबरोबरच कोल्हापूरी फुटबॉल प्रेमींनाही लागून राहिली आहे.
खेळाडूंना पदरात फुल ना फुलाची पाकळी…
आज ना उद्या फुटबॉल हंगामाचा किकऑफ होईल, हे गृहीत धरुन तुल्यबळ खेळाडूंना संघांमध्ये स्थान दिले आहे. शिवाय निवडक खेळाडूंना 10 हजारपासून ते 70 हजार रुपयांपर्यंत पैसे देण्याची तयारी ठेवली आहे. काही संघांनी तर खेळाडूंना थोडी रक्कमही देऊ केली आहे. प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने मात्र खेळाडूंना प्रत्येक सामन्यावर पैसे देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून थांबलेली खेळाडूंची आर्थिक चलती पुन्हा सुरु झाली आहे.