माशेल भागात गणेशोत्सव भक्तीभावाने साध्या प्रमाणात
वार्ताहर / माशेल
माशेल, खांडोळा, अडकोण, भोम भागात लोकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करीत गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा केला. विसर्जनस्थळी श्रीला वाहिलेली फुले अर्थात ‘निर्माल्य’ व इतर कचरा गोळा करण्यासाठी येथील युवकांतर्फे विसर्जनघाटावर तीन विविध कचराकुंडय़ाची सोय करण्यात आली. विसर्जनसस्थळावर ‘निर्माल्य’ गोळा करताना तारीवाडा येथील पर्यावरणप्रेमी युवकांतर्फे स्वच्छ भारत संदेश देत विविध ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी पिशव्या ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कोरोनाच्या सावटात गणेशभाविकांनी उत्सव दिड दिवसांवर आटोपला. यंदा गणेशपूजाविधीला पुरोहित उपलब्ध नसल्याने बहुतेकांनी भ्रमाणध्वनी व सोशल मिडीयांच्या वापराने गणेशपुजेचे यजमानपद भूषविले.
स्थानिक युवकांतर्फे कोरोनाकाळात स्वच्छतेचा संदेश
कोरोना काळात स्वच्छता राखावी या उद्देशाने स्थानिक युवकांतर्फे विसर्जनघाटावर ‘देवाला वाहिलेली फुले’-‘निर्माल्य’ त्याचबरोबर कागदी कचरा व प्लास्टीक कचरा असे वर्गीकरण करत कचरापुंडय़ा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे विसर्जनानंतर निर्माल्य सर्रास नदीच्या पात्रात सोडून देण्याच्या प्रकारापासूनही सुटका मिळाली. प्रत्येक गावात निर्माल्य संकलनासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवाच्या काळात विर्सजन घाटाजवळ ही सोय करावी असे आवाहनही युवकांतर्फे करण्यात आले आहे.
महामारीमुळे यंदा लोकांनी दीड दिवसांच्या श्रींचे सायंकाळी 5 वा. विसर्जनास सुरवात केली. युवकांतर्फे कचराकुंडय़ाची चोख व्यवस्थेचे ग्रामस्थांनी कौतुक केले. पंच सिद्धा गाड यांनी पंचायतीच्या सहकार्याने गणपती विसर्जनासाठी होडी उपलब्ध करून श्रीचे विसर्जनात हातभार लावला. भाविकांनी दक्षता बाळगल्यामुळे यंदा फटाक्याची आतषबाजी दिसलीच नाही
दरम्यान भोम अडकोणचे सरपंच सुनिल भोमकर यांनी घरोघरी भेट देत कोरोनाकाळात गणेशोत्सव सामाजिक अंतर पालन करीत कसा साजरा करावा यासंबंधी पत्रके वाटून जागृती मोहीम राबविली. विसर्जनासाठी गर्दीचा माहोल होणार नाही याचीही दक्षता घेत माशेल भागात गणेशोत्सव उत्साही मुडमध्ये साजरा करण्यात आला.