शिखविरोधी अन् गोध्रा दंगलीची केली होती चौकशी
वृत्तसंस्था / अहमदाबाद
1984 च्या शिखविरोधी आणि 2002 मधील गोध्रा दंगलींची चौकशी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गिरीश ठाकोरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले आहे. 86 वर्षीय नानावटींचे गुजरातमध्ये शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
न्यायाधीश नानावटी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1935 झाला होता. 1958 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीस प्रारंभ केला होता. 1979 मध्ये त्यांना गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर 1993 मध्ये त्यांची ओडिशा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.
6 मार्च 1995 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी ओडिशा, गुजरात आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. 16 फेब्रुवारी 2000 रोजी ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते.
न्यायाधीश नानावटी आणि अक्षय मेहता यांनी 2014 मध्ये 2002 च्या दंगलीसंबंधी स्वतःचा अंतिम अहवाल गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना सोपविला होता. या हिंसेत हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. तर रालोआ सरकारने 1984 च्या शिखविरोधी दंगलींच्या चौकशीसाठी नानावटी आयोग स्थापन केला होता. ते या आयोगाचे एकमात्र सदस्य होते.