प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील नागरिक तथा मुष्टीफंड हायस्कूलचा विद्यार्थी यश गजानन तार यांनी राज्यभरात घेण्यात आलेल्या नीटच्या परीक्षेत दुसरा येण्याचा मान मिळविला आहे तर हायस्कूलात ते पहिले आले आहे. खोर्ली म्हापसा येथील सारस्वत विद्यालयातून त्यांनी 96 टक्के गुण मिळवून विशेष श्रेणीत आले होते. यश यांची संपूर्ण पिढी डॉक्टर क्षेत्रात असून ती परंपरा पुढे ठेवता आपणही डॉक्टर होणार असल्याची माहिती त्यांनी दै. ‘तरुण भारत’ला बोलताना दिली.
यश म्हणाले की, आपल्यास 720 गुणापैकी 671 गुण प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय आपण पालक वर्गांना देत असल्याचे त्यांनी सांगितले. आपले आजोबा डॉ. विनायक तार, पप्पा, काका, मम्मी आदी सर्वजण डॉक्टर क्षेत्रात असल्यानेच आपणही त्यांचा वारसा पुढे नेण्याचा ठरविले असल्याने आपण विज्ञान शाखा निवडली असल्याचे ते म्हणाले. कोविडच्या काळात अभ्यासावर थोडा परिणाम झाला. ऑनलाईन शाखा सुरू होत्या अशा परिस्थितीत अभ्यासावर मात करून आम्ही पुढे आलो. कोविड काळात परीक्षा कशा होणार, पेपर कसे असेल याची भीती होती मात्र ते सर्वकाही मागे राहिले. रात्री उशीरापर्यंत आपण अभ्यास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांनी आपल्यास खूप पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले. आपल्यास डॉक्टर होण्यास आवडेल असे ते म्हणाले. स्वतःची आपल्यास आवड आहेच व आपल्या पालकाचे कष्ट आपण सदैव पाहिले आहे त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जाणे पसंत करीन असे यश म्हणाले. आपण पुढे जाऊन काहीतरी करणारच हे ध्येय मनात असणे गरजेचे आणि चांगले मित्र करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनी एकमेकांना आपल्या अभ्यासात मदत करावी असा उद्देश त्यांनी युवा पिढीला दिला.
पूर्वी पेक्षा यंदा गुणांचा इतिहास- डॉ. गजानन तार
डॉ. गजानन तार म्हणाले, मुष्टीफंडमधून आपला मुलगा नीटमध्ये द्वितीय आले आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे. इतके गुण यापूर्वी कुणीही घेतलेले नाही. पूर्वीच्या गुणाची आकडेवारी पार करून विद्यार्थ्यांनी इतिहास निर्माण केला आहे. शाळेचेही त्यांना खूप मोठे योगदान मिळाले असल्याचे ते म्हणाले. यश अभ्यासात रमून जात होता. तो विशेष श्रेणीत येणार हे माहीत होते मात्र परीक्षेच्या निकालानंतर त्याचे गुण अपेक्षेच्या पलिकडे मिळाले. आम्हाला आमच्या मुलांवर गर्व आहे असे त्यांची आई मल्लीका तार म्हणाल्या. तर त्याची वयोवृद्ध आजी श्रीमती मिलन तार यांनी यश लहानपणापासूनच हुषार होता व त्यांनी यश प्राप्त करून आमच्या घराण्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांची बहीण नुपूर तार यांनी यशच्या अभ्यासात सदैव पाठींबा दिला असल्याचे सांगितले.