पानिपत येथील भालफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये अभुतपूर्व कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. यामुळे सारा देश आनंदात आहे. पानिपत येथील पोस्ट खात्याने अनोख्या पद्धतीने चोप्राचा सुवर्ण विजय साजरा केला. येथील पोस्ट विभागाने सुवर्णपदकाच्या आनंदाप्रत्यर्थ पत्र टाकण्याचे पोस्ट बॉक्सेस सोनेरी रंगात रंगविले आहेत. सर्वसाधारणतः या पत्रपेटीचा रंग तांबडा असतो पण आता येथील बऱयाच पत्रपेटय़ा सोन्याच्या झळाळीने चमकू लागल्या आहेत. येथील मुख्य पोस्टमास्टर रंजूप्रसाद यांची ही कल्पना आहे. सारा देश आपापल्या पद्धतीने सुवर्णपदकाचा आनंद व्यक्त करीत असताना पोस्ट खात्यानेही मागे राहणे योग्य दिसले नसते शिवाय नीरज चोप्रा हा स्थानिक महानायक असल्याने त्याच्या सुवर्णपदकाचा आम्ही अशाप्रकारे सन्मान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पानिपत येथील लोकांनाही ही कल्पना आवडली असून पत्रपेटीत पडणाऱया पत्रांची संख्याही वाढल्याचे दिसून येत आहे.
सध्याच्या काळात एसएमएस किंवा व्हॉटसअपवरून निरोपांची देवाणघेवाण सर्वाधिक प्रमाणात होते पण या सुवर्णपेटीत एक तरी पत्र आपण टाकले पाहिजे अशी भावना पानिपत येथील अनेक नागरिकांचीही झाली असून त्यामुळेच कित्येक तरुणांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले पोस्ट कार्ड लिहून अशा पत्रपेटय़ांमध्ये टाकले आहे.