प्रतिनिधी /बेंगळूर
कर्नाटकाचे 19 वे राज्यपाल म्हणून थावरचंद गेहलोत यांनी रविवारी पदभार स्वीकारला. बेंगळूरमधील राजभवन येथील ग्लास हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय ओक यांनी नूतन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना पद आणि गोपनियतेची शपथ देवविली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी ईश्वराच्या नावे हिंदीतून शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी राष्ट्रपतींकडून मिळालेल्या नियुक्तीचे पत्राचे वाचन केले. यावेळी मावळते राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, डॉ. सी. एन. अश्वथनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्माई आदी मान्यवर उपस्थित होते.