कोकण मार्गावर नातूवाडीनजीकची घटना, रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत
प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक- एर्नाकुलम नेत्रावती एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नातूवाडी बोगद्यानजीकच बिघाड झाला. बोगद्यातच इंजिनमध्ये झालेल्या बिघाडाने रेल्वे प्रशासनाची एकच धावाधाव सुरू झाली. खेड येथून रिलिफ इंजिन मागवण्यात आले. तब्बल एक ते दीड तास नेत्रावती एक्सप्रेस बोगद्यातच अडकल्याने प्रवाशी कमालीचे धास्तावले. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कोकण मार्गावर नेत्रावती एक्सप्रेस नियमितपणे चालवण्यात येत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस एर्नाकुलम नेत्रावती एक्सप्रेस नातूवाडी बोगद्यानजीक आली असता अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लोकोपाथलटच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत तातडीने वरिष्ठ कार्यालयास कळवले. बोगद्यातच इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाची त्रेधातिरपीटच उडाली. तब्बल एक ते दीड तास ही एक्सप्रेस बोगद्यातच उभी होती.
नेत्रावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, एक्सप्रेस बोगद्यातच रखडल्याने आतमधील प्रवाशांना चांगलाच घाम फुटला. रेल्वे प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खेड येथून नवीन रिलिफ इंजिन मागवण्यात आले. हे इंजिन जोडल्यानंतरच नेत्रावती एक्सप्रेस एर्नाकुलमच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुरते बिघडले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला खेड स्थानकात तर चिपळूण स्थानकातही रेल्वेगाड्या थांबवण्यात आल्या.