ऑनलाईन टीम / अॅमस्टरडॅम :
नेदरलँडमध्ये कोरोना संक्रमित झालेले मिंक प्राणी आढळले आहेत. या प्राण्यांमधून माणसाला कोरोनाची बाधा होऊ शकते, या भीतीने नेदरलँड सरकारने 10 हजार मिंक प्राण्यांना मारण्याचा आदेश दिला आहे.
मिंक हा प्राणी भारतातील मुंगूस प्राण्यासारखा दिसतो. या प्राण्यांची लांबी साधारणपणे 3.50 सेमी तर वजन 2 किलोपर्यंत असते. फरसाठी हे प्राणी नेदरलँडमध्ये पाळले जातात. 10 शेतात या प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नेदरलँडच्या अन्न प्राधिकरणाचे प्रवक्ते म्हणाले, एप्रिल महिन्यात ब्रिडींगच्या अनेक शेतातील मिंकला त्यांच्या मालकामुळे कोरोनाची बाधा झाली होती. या प्राण्यांमुळे मे महिन्यात दोन व्यक्तींना कोरोना झाला. तपासणीनंतर 10 शेतातील प्राण्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 10 हजार प्राण्यांना मारण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
ज्या शेतातील मिंक प्राणी कोरोना संक्रमित आढळले आहेत, तेथील मिंक ब्रिडींग फार्म सॅनिटराईज करण्यात येतील. इतर शेतातील काम सुरू ठेवण्यात येईल. देशातील मिंक वाहतुकीवर या देशात बंदी घालण्यात आली आहे.