वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळच्या हुमला भागात चीनकडून 9 इमारतींच्या होत असलेल्या निर्मितीला जोरदार विरोध सुरू झाला आहे. चिनी दूतावासाबाहेर मोठय़ा संख्येत निदर्शक एकत्र आले असून त्यांनी गो बॅक चायनाच्या घोषणा दिल्या आहेत.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे चीनसोबत जवळीक ठेवून आहेत. तर चीन नेपाळच्या भूमीवर वेगाने कब्जा करू लागला आहे. चीनने नेपाळच्या हुमला भागात किमान 9 इमारतींची निर्मिती केली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चीनच्या घुसखोरीची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यापासून ओली सरकार दबावाखाली आहे.
चिनी घुसखोरीची पुष्टी
हुमलाचे सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकरी दलबहादुर हमाल यांनी 30 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत तेथील लापचा-लिमी क्षेत्राची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान त्यांना नेपाळच्या भूमीवर चीनने उभारलेल्या 9 इमारती दिसून आल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी एकाच इमारतीचा उल्लेख केला होता. पाहणीनंतर तेथे अशाप्रकारच्या आणखी 8 इमारती आढळून आल्या आहेत.
नेपाळमधील उपेक्षित क्षेत्र हुमला जिल्हय़ाचे लापचा-लिपू क्षेत्र मुख्यालयापासून दूर असल्याने सदैव उपेक्षित राहिले आहे. नेपाळने या क्षेत्रात कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती केलेली नाही. नेपाळचे अधिकारी या क्षेत्राचा कधीच दौरा करत नाहीत. चीनने नेपाळच्या याच दुर्लक्षाचा लाभ घेत त्याच्या क्षेत्रात या इमारतींची निर्मिती केली आहे.