ओली-प्रचंड यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न
वृत्तसंस्था/काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना स्वतःच्या हातचे बाहुले करणाऱया चीनला नव्या राजकीय संकटानंतर स्वतःचा प्रभाव ओसरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. याचमुळे चीन नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात सुरू असलेल्या महासंकटादरम्यान त्वरेने स्वतःचा मंत्री पाठवत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री गूओ येझोउ नेपाळमध्ये दाखल होणार आहेत. पंतप्रधान ओली आणि त्यांचे विरोधक पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्यातील वाद सोडविण्याचा ते अखेरचा प्रयत्न करणार असल्याचे मानले जाते.
येझोउ रविवारी राजधानी काठमांडूत पोहोचतील. चिनी नेत्याच्या या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या राजदूत हाओ यांकी यांनी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. चिनी मंत्री या दौऱयात दोन्ही गटांच्या नेत्यांशी चर्चा करू शकतात. कम्युनिस्ट पक्षाला फुटण्यापासून वाचविण्यासाठी चिनी राजदूतांनी पूर्ण शक्ती पणाला लावली असली तरीही त्यांना यश मिळण्याची चिन्हे नाहीत. नेपाळमध्ये संसद विसर्जित झाल्यावर राजकीय अनिश्चिततेचे वातावरण आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आल्यापासूनच भारतविरोधी भावनेला खतपाणी घातले जात होते, परंतु नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्ष कमकुवत झाल्यास त्याचे भारताशी असलेले संबंध पुन्हा पूर्वपदावर येऊ शकतात.