प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील बहे ओढ्यात सापडलेल्या मृत मंगल पांडूरंग गुरव (४६) हीचा खून झाला होता, तो अनैतिक संबंध व ५० हजार रुपये मागितल्याच्या कारणावरुन कापूसखेडच्या एकाने केल्याचे उघडकीस आले. अशोक पांडूरंग डेळेकर (४६,रा.कापूसखेड), असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याला पोलीसांनी अटक केली आहे.
मंगल गुरव ही दि. २ रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घरातून तासाभरात येतो म्हणून निघून गेली होती. याबाबत नातेवाईकांनी पाहुण्याकडे चौकशी केली. पण ती मिळून न आल्याने तिचा मुलगा अक्षय पांडूरंग गुरव याने दि. ५ रोजी कासेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शुक्रवार दि. ९ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंगल गुरव यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत बहे येथील ओढयात मिळून आला होता. हा मृतदेह पाण्यात सडलेल्या अवस्थेत होता. याप्रकरणी या महिलेचा भाऊ बजरंग गुरव यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. उतरीय तपासणी दरम्यान तिच्या कपाळावर उजव्या बाजूस, चेहऱ्यावरील उजवे बाजूचे हाड, कवटीचे हाड व वरचे दात तुटल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीसांनी या महिलेचा खून झाल्याचे ओळखून तपासाला दिशा दिली.
शनिवारी संशयावरुन पोलीसांनी काहींना ताब्यात घेतले. दरम्यान डेळेकर याचे या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले. त्याच्या मोबाईलची तांत्रिक माहिती मिळवून पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. ही महिला इस्लामपूर येथे धुणीभांडी करण्याचे काम करीत होती. डेळेकर हा तिला नेर्ले येथून रोज ने-आण करीत होता. शुक्रवार दि २ एप्रिल रोजी डेळेकर याने तिला मोटार सायकलवरुन नेर्ले बहे ओढयालगत नेले. यावेळी गुरव हिने डेळेकर याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. यातून डेळेकर याने तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. तोंड बांधण्याच्या स्कार्पने ५० फुट ओढत नेवून मृतदेह ओढयामध्ये टाकला. सुरुवातीला डेळेकर हा उडावाउडवीची उत्तरे देत होता. पण पोलीसांकडे त्याने खूनाची कबुली दिली. अल्पावधीतच पोलीस पथकाने या खूनाचा छडा लावला.