बेळगाव : रेल्वेबांधणी, रेल्वेमार्ग तयार करताना शिल्लक राहिलेले लोखंड, तसेच जुने भंगार नैर्त्रुत्य रेल्वेने विक्री केले. भंगार विक्रीसाठी नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने निविदा काढल्या होत्या. भंगार विक्रीतून 1.25 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
रेल्वेचे जुने भाग काढून त्या ठिकाणी नवे भाग बसविले जातात. तसेच खराब झालेले साहित्य स्क्रॅप केले जाते. रेल्वेमार्गाच्या लोखंडी प्लेट, रेल्वेतील कोचिंग डेपोतील उर्वरित साहित्य, जुन्या झालेल्या बोगींचे साहित्य भंगारात टाकण्यात येते. या भंगाराच्या विक्रीसाठी निविदा काढण्यात येतात. अधिक दर देणाऱया कंत्राटदाराला भंगाराची विक्री करण्यात येते. हुबळी विभागाने काही दिवसांपूर्वीच भंगार विक्रीसाठी निविदा काढल्या होत्या. त्यानुसार 1.25 कोटी रुपयांचा महसूल नैर्त्रुत्य रेल्वेकडे जमा झाला आहे. आतापर्यंत नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने 26.93 कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री केली आहे. भंगार विक्रीतून रेल्वेला चांगला महसूल मिळत आहे.