प्रतिनिधी/इस्लामपूर
मुलास भारतीय रेल्वेसह अन्य ठिकाणी नोकरी लावतो म्हणून कराड तालुक्यातील तांबवे येथील राजेंद्रकुमार कोंडीबा शिंदे (49) यांना सहा जणांच्या टोळीने नऊ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना दोन वर्षापूर्वी घडली. शिंदे यांनी काही रक्कम रोख दिली आहे तर काही रक्कम बँकेतून संशयित आरोपींच्या खात्यावर वेळोवेळी वर्ग केली आहे.
डॉ. मनिषा प्रमोद मांदाडे (रा. उत्तर दादर, पश्चिम मुंबई), कामेश्वर सिंग, हर्षल, रितेश गोपाळराव मोंढे (रा. मंत्रीनगर बेलतरोडी, नागपूर), राज सिंगानिया, अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. यातील बहुतेक आरोपींची पूर्ण नावे व पत्त शिंदे यांना माहित नाहीत.
शिंदे हे माजी सैनिक आहेत. त्यांचा मुलगा राहूल हा अभियांत्रिकीमध्ये शिकतो. जानेवारी 2018 मध्ये राजेंद्रकुमार शिंदे हे व्यक्तीगत कामासाठी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी त्यांना डॉ. मांदाडे ही भेटली. पहिल्याच ओळखीत त्यांनी तुमच्या घरी नोकरीसाठी कुणी गरजू असल्यास सांगा त्यास भारती रेल्वे, भारतीय खाद्य निगम, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, आयआरसीटीसी, भारतीय कोळसा निगम या ठिकाणी कुठेही नोकरी लावतो असे सांगितले. त्यांनी परस्परांचे मोबाईलनंबरची देवाण-घेवाण केली. शिंदे यांनी घरी येवून नातेवाईक संदीप आवटी चर्चा केली.
सुमारे महिनाभरानंतर मांदाडे हिचा शिंदेंना फोन आला. तुमच्या मुलास नोकरी लावतो म्हणून भारतीय रेल्वे व नागपूर मुंबई मेट्रोमध्ये नोकरी लावण्यासाठी 10 लाख रुपये अन्य खात्यात लिपिक पदासाठी नोकरी लावण्यासाठी साडे आठ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. शिंदे यांनी रेल्वे टीसी पदाला पसंती देवून 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली.
फेबुवारी 2018 मध्ये मांदाडी ही इस्लामपूर येथे चर्चेसाठी आली. दरम्यान तिला शिंदे व आवटे यांनी रोख एक लाख रुपये बसस्थानक परिसरात दिले. त्यानंतर तिने जून 2018 मध्ये राहूल हा आयआरसीटीसी मध्ये नोकरीस पात्र ठरला आहे. वेबसाईट पहा, असा निरोप फोनवरुन दिला. त्यांनी वेबसाईड पाहिली असता, ही नोकरी कॉन्ट्रक्ट पध्दतीने असल्याचे लक्षात आल्याने नकार कळवला.
त्यानंतर मांदाडे शिंदेंच्या संपर्कात राहून पैशाची मागणी करीत होती. त्याप्रमाणे तिच्या सांगण्यावरुन आयसीआयसीआय बँक शाखा महालक्ष्मी मुंबई येथील खात्यावर मे 2018 मध्ये 1 लाख रुपये पाठवले. पुढे जून 2018 मध्ये मांदाडे हिच्या सांगण्यावरुन मोंढे याच्या खात्यावर पैसे पाठवले. तिने जुलै मध्ये नागपूर येथे मोंढे व हर्षल यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिंदे मुलास घेवून गेले. त्यावेळी त्यांनी टिसी पदासाठी पैशाची मागणी केली. तिथे मुक्काम केला.
दरम्यान मोंढे व हर्षल या दोघांची विमानाची तिकीटे आणून दिली. कलकत्ता येथून हवडा पश्चिम बंगला येथील येथे गेले. हर्षल याने त्यांना एका हॉटेलवर ठेवले. त्यावेळी पुन्हा पलटी मारुन रेल्वेमध्ये नसून आयआरसीटीसीमध्ये काम होणार असल्याचे सांगितले. पुन्हा विमानाने ते परतले. शिंदे यांनी मांदाडे हिच्या संपर्क साधला असता, तिने टीसीपदाचे अमिष दाखवले. पुन्हा 7 ऑक्टोबर 2018 रोजी शिंदे हे मुलगा राहूल, व नातेवाईक आवटे यांना घेवून पुन्हा हवडाला गेले. दुसऱया दिवशी सकाळी 8 वा. मांदाडे या हॉटेलवर आली. मुलास मुलाखतीसाठी तिने तयार राहण्यास सांगितले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांचा चार दिवस मुक्काम झाला.
दरम्यान तिने कामेश्वरशी फोन लावून दिला. मुलगा आठ दिवस त्या ठिकाणी राहून बिन नोकरीचाच परतला. पुन्हा वेगवेगळी अमिष दाखवून शिंदे यांना झुलवत ठेवले. त्यापुढेही त्यांनी खात्यावरुन रक्कमा उकळल्या. डिसेंबर 2018 मध्ये ही त्यांनी पुन्हा कलकत्त्याची फेरी मारली. त्याठिकाणी फोटो, हाताच्या बोटांचे ठसे घेण्याचे नाटक केले. काम झाल्याचे खोटेच सांगण्यात आले. 15 दिवसाची मुदत देण्यात आली. पुढे मांदाडे व सिंग यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला. शिंदे यांनी पैशाची परत मागणी केली. पण त्यांनी पैसे ही दिले नाहीत, आणि भेटही घेतली नाही. अखेर शिंदे यांनी बुधवारी इस्लामपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते करीत आहेत.