वृत्तसंस्था/ ऑकलंड
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान न्यूझीलंडने शुक्रवारी पहिल्या सामन्यात पाकचा पाच गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात न्यूझीलंडच्या जेकॉब डुफीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकने 20 षटकात 9 बाद 153 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 18.5 षटकात 5 गडी बाद 156 धावा जमवित हा सामना जिंकला.
पाकच्या डावामध्ये न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या स्वींग गोलंदाजीवर पाकचे फलंदाज लवकर बाद केले. पाकच्या डावात कर्णधार शादाब खानने 32 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 42, फहीम अश्रफने 18 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 31, इमाद वासीमने 14 चेंडूत 2 चौकारांसह 19, सलामीच्या मोहमद रिजवानने 17 चेंडूत 3 चौकारांसह 17, खुशदिल शहाने 20 चेंडूत 2 चौकारांसह 16 तसेच शाहीन आफ्रिदिने 5 चेंडूत 1 षटकारासह 10 आणि वहाब रियाजने 5 चेंडूत 1 षटकारासह 9 धावा जमविल्या.
पाकच्या डावात 8 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेकॉब डुफीने 33 धावात 4, कुगलेजीनने 27 धावात 3, सोधी आणि टिकनेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या सीफर्टने 43 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 57, चॅपमनने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34, फ्लिप्सने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23, निश्चॅमने 10 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 15, कर्णधार सँटेनरने 8 चेंडूत 1 षटकारासह 12, गुप्टिलने 10 चेंडूत 6 तर कॉनवेने 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. पाक संघातर्फे हॅरिस रॉफने 29 धावात 3 तर शाहीन आफ्रिदीने 27 धावात 2 गडी बाद केले.
न्यूझीलंडतर्फे नवोदित गोलंदाज डुफीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण करताना पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर पहिला बळी मिळविला. त्यानंतर त्याने पाकच्या डावातील आपल्या दुसऱया षटकात पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर आणखी दोन बळी घेतले. गोलंदाजीच्या आपल्या दुसऱया हप्त्यामध्ये त्याने पाकचा कर्णधार शादाब खानला बाद केले. ईडन पार्कची खेळपट्टी स्विंग आणि वेगवान गोलंदाजीला अधिक अनुकूल ठरली. न्यूझीलंडतर्फे सीफर्ट आणि चॅपमन यांनी चौथ्या गडय़ासाठी 45 धावांची भर घातली.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकात 9 बाद 153 (शादाब खान 42, फहीम अश्रफ 31, इमाद वासीम 19, मोहमद रिजवान 17, खुशदिल शहा 16, शाहीन आफ्रिदी नाबाद 10, डुफी 4-33, कुगलेजीन 3-27, सोधी 1-37, टिकनेर 1-35).
न्यूझीलंड 18.5 षटकात 5 बाद 156 (सीफर्ट 57, चॅपमन 34, फिलिप्स 23, निश्चॅम नाबाद 15, सँटेनर नाबाद 12, कॉनवे 5, गप्टिल 6, हॅरिस रॉफ 3-29, शाहीन आफ्रिदी 2-27).