वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :
ट्रम्प कॅम्पेन (अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचारमोहीम) न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राच्या विरोधात बुधवारी गुन्हा नोंदविला आहे. वृत्तपत्राने 2016 च्या निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांनी रशियाशी संगनमत केल्याचे खोटे वृत्त छापल्याचा आरोप आहे.
2016 मधील अध्यक्षीय पदाच्या डेमोक्रेटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पराभूत करण्यासाठी ट्रम्प यांनी रशियाशी हातमिळवणी केल्याचे वृत्तपत्राने म्हटले होते. वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त मार्च 2019 मध्ये ओपिनियन सेक्शनमध्ये ‘द रियल ट्रम्प-रशिया क्विड प्रो क्यू’ मथळय़ासह प्रकाशित केले होते.
यासंबंधीचा लेख न्यूयॉर्क टाईम्सचे माजी कार्यकारी संपादक मॅक्स प्रँकेल यांनी लिहिला होता. लेखात त्यांनी ट्रम्प यांचे काही अधिकारी अणि रशियन प्रतिनिधी यांच्यातील कथित संभाषणाचा उल्लेख केला होता. ट्रम्प कॅम्पेन आणि रशियन अधिकाऱयांनी हिलरींना पराभूत करण्यासाठी संगनमत केल्याचा प्रँकेल यांनी नमूद केले होते.
वृत्त चुकीचे!
हा लेख कुठल्याही पुराव्याशिवाय प्रकाशित करण्यात आला होता असा दावा ट्रम्प यांचे वरिष्ठ कायदेशीर सल्लागार जेना इलिस यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या विरोधात हेतुपुरस्पर चुकीचे वृत्त छापल्याप्रकरणी वृत्तपत्राला उत्तरदायी ठरविणे हा खटल्याचा उद्देश आहे. न्यूयॉर्क टाईम्सचे वृत्त धादांत खोटे असल्याचे इलिस यांनी म्हटले आहे.
उघडपणे मत मांडू शकतो
वृत्तपत्र या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार आहे. ट्रम्प कॅम्पेनने ओपिनियन रायटरला स्वतःच्या विचारांसाठी शिक्षा मिळवून देण्याच्या हेतूने न्यायालयात धाव घेतली आहे. देशाचा कायदा नागरिकांचे अधिकार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करतो. विशेषकरून सार्वजनिक घटनांवर आम्ही उघडपणे मत मांडू शकतो असे वृत्तपत्राचे प्रवक्ते एलीन मर्फी यांनी म्हटले आहे.