मुर्शिदाबादमध्ये टीएमसी-सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये हिंसक हाणामारी
वृत्तसंस्था/ मुर्शिदाबाद
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे पंचायत निवडणुकांवरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. दगडफेक आणि गोळीबाराचे सत्र सुरू असून सीपीएम आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचायत निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली असून दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आल्याने काही भागात तणाव निर्माण झाला आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका काँग्रेस कार्यकर्त्यालाही आपला जीव गमवावा लागला. एवढेच नाही तर या हिंसाचारात डझनभर लोक जखमी झाले असून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.
पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुर्शिदाबाद जिह्यातील खग्राम पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रतनपूर नलदीप गावात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. फुलचंद शेखर असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला.