ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आज चंदीगढमध्ये पार पडला. यावेळी आपच्या दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मान यांनी नव्या मंत्रिमंडळात प्रत्येक विभाग आणि क्षेत्राला सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दलित, महिला आणि हिंदू समाजातील आमदारांनाही त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. थोडय़ाच वेळात या मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. त्यामध्ये मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी होणार आहे.
मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये हरपाल सिंह चीमा, बलजीत कौर, हरभजन सिंह ईतो, विजय सिंघला, लाल सिंह कटरौचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरज्योत सिंह बैंस यांच समावेश आहे. दरम्यान, 16 मार्चला भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या खटकड कलान या मूळ गावी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज मान सरकारमधील मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
मान यांच्या मंत्रिमंडळात 3 जाट शीख, 3 हिंदू आणि 4 दलित आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात मान यांनी जातीय समतोल राखला आहे.