केवल कृष्णा बावा लुधियाना पश्चिमधून अपक्ष लढणार
काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी समोर आल्यावर बंडखोरीला ऊत आला आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते केवल कृष्णा बावा यांनी बंडखोरीचे सूर काढले आहेत. काँग्रेसमध्ये पैसे घेऊन तिकिटवाटप करण्यात आल्याचा आरोप बावा यांनी केला आहे. लुधियाना पश्चिम मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून मंगळवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बावा यांनी सांगितले आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने कॅबिनेट मंत्री भारत भूषण आशू निवडणूक लढवत आहेत.
भारत भूषण आशू यांच्याविरोधात आणखीन एका सहकाऱयाने बंडखोरी केली आहे. तरुण जैन बावा आणि गुरप्रीत गोगी यांनीही बंडखोरी केल्याने आशू यांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत.
काँग्रेसमध्ये यापूर्वीच साहनेवाल मतदारसंघात सतविंदर कौर बिट्टी, समराला मतदारसंघात अमरीक सिंह ढिल्लो, जगराओं मतदारसंघात मलकीत सिंह दाखा, माजी आमदार जसबीर सिंह जस्सी खंगूडा यांनी बंडखोरी केली आहे. अमरीक सिंह ढिल्लों यांनी अपक्ष म्हणून अर्ज देखील भरला आहे. तर जस्सी खंगूडा यांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे.