उत्तर प्रदेशमध्ये तिसऱया टप्प्यात 59 जागांसाठी निवडणूक
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता संपला. राज्यातील सर्व 117 मतदारसंघांमध्ये रविवार, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. पंजाबबरोबरच उत्तरप्रदेशमध्ये तिसऱया टप्प्यात 59 मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. राज्यातील एकूण 9 जिल्हय़ांमध्ये हे 59 मतदारसंघ व्यापलेले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया आयोगाने जवळपास पूर्ण केली आहे. शनिवारी निवडणूक अधिकारी-कर्मचारी मतदानासाठी आवश्यक सामुग्री घेऊन जिल्हय़ांच्या ठिकाणावरून आपापल्या केंद्रांवर रवाना होतील.
पंजाबमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी जाहीर प्रचारावर भर दिला होता. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ज्येष्ठ शीख नेत्यांशी संवाद साधत त्यांच्या समुदायाची मते वळविण्याचा प्रयत्न केला. तसेच आम आदमी पार्टी, काँग्रेस यांनीही प्रचारसभांचा धडाका लावला होता. आता राज्यातील प्रचार थंडावल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेतेमंडळी माघारी परतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेरून निवडणूक प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना पंजाब सोडावा लागला.