मुंबई / वृत्तसंस्था
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स व केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघ आमनेसामने भिडतील, त्यावेळी या दोन्ही संघातील मध्यफळीचा प्रामुख्याने कस लागणार आहे. दिल्ली व पंजाब या दोन्ही संघांना आपल्या मागील लढतीत पराभव पत्करावा लागला असून कागदावर दिल्लीचा संघ सरस भासतो. मात्र, प्रत्यक्षात कोणता संघ बाजी मारेल, हे आजच्या लढतीत स्पष्ट होऊ शकेल. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
आयपीएल नेतृत्वाचा फारसा अनुभव नसलेल्या पंतला मागील सामन्यात त्याचा सर्वोत्तम गोलंदाज रविचंद्रन अश्विनचा कोटा पूर्ण करवून घेता आला नव्हता. त्याऐवजी त्याने टॉम करणकडून 4 षटके करवून घेतली होती. ऍनरिच नोर्त्झे अंतिम एकादशमध्ये दाखल होत असल्याने ही या संघाची जमेची बाजू ठरु शकते.
पंजाब किंग्सचा संघ यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढतीत दीपक चहरच्या उसळत्या गोलंदाजीसमोर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत राहिला आणि ही त्यांची मुख्य चिंता आहे. वानखेडे स्टेडियमवर प्रकाशझोतातील सामन्यात डय़ू फॅक्टर फलंदाजांसाठी कमालीचा त्रासदायक ठरत आला असून यामुळे केएल राहुल विरुद्ध कॅगिसो रबाडा व ख्रिस वोक्स विरुद्ध ख्रिस गेल अशी जुगलबंदी रंगली तर यात आश्चर्याचे कारण असणार नाही.
दिल्लीचा संघ शॉ, धवन, पंत यांच्यावर तर पंजाबचा संघ केएल राहुल, ख्रिस गेल व दीपक हुडा यांच्यावर अधिक अवलंबून आहे. आता दोन्ही संघ काही बाबतीत कमकुवत देखील आहेत. अजिंक्य रहाणे पॉवर हिटिंग करु शकत नाही आणि स्टोईनिसकडे सातत्य नाही, याचा दिल्लीला फटका बसत आहे तर मयांक बॅडपॅचमधून जात असल्याने व निकोलस पूरन उसळत्या गोलंदाजीविरुद्ध अपयशी ठरत असल्याने याची पंजाबला मोठी किंमत मोजावी लागत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
पंजाब किंग्स ः केएल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार.
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करण, सॅम बिलिंग्ज.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.