क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या लढतीत चेन्नईन सिटी, पंजाब एफसी आणि ट्राव संघाने विजय नोंदविले. कोलकातात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सिटीने नॅरोका एफसीचा 2-1 गोलानी पराभव केला. विनीतकुमार वेलमुरगन आणि डॅमीर ऍवडीकने चेन्नईसाठी तर नॅरोका एफसीचा एकमेव गोल सुभाष सिंगने केला. आता विजयाने चेन्नईनचे 6 सामन्यांतून 9 तर नॅरोकाचे 6 सामन्यांतून 5 गुण झाले आहेत.
कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात पंजाब एफसीने इंडियन ऍरोजचा 2-1 गोलानी पराभव केला. पंजाबचे दोन्ही गोल बाबा दियावाराने तर इंडियन ऍरोजचा एकमेव गोल वॅलिंग्टन फर्नांडिसने केले. पंजाबचे आता 7 सामन्यांतून 11 तर ऍरोजचा 7 सामन्यांतून फक्त एक गुण झाला आहे. प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात ट्राव संघाने ऍजोल एफसीचा कोमोरोन तुरसोनोव्हने पाचव्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलने पराभव केला. विजयाच्या तीन गुणानी ट्रावचे आता 7 सामन्यांतून 10 तर ऍजोल एफसीचे 6 सामन्यांतून 8 गुण झाले आहेत.