वनरक्षक योगेश वेळीप याचे स्पष्टीकरण, पोलिसांनी केले कुटुंबियांच्या स्वाधीन, प्रकरणाचे गूढ कायम
प्रतिनिधी / काणकोण
खोतीगाव अभयारण्य विभागातील वेदुमळ चेकनाक्यावर वनरक्षक म्हणून काम करताना 27 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या योगेश वेळीप याला 2 रोजी पंढरपूर (महाराष्ट्र) पोलीस स्थानकावरून ताब्यात घेऊन काणकोणच्या पोलिसांनी त्याला काणकोणात आणले. वेळीप याला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले असल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. वेळीप याचे अकस्मात बेपत्ता होणे हे एक प्रकारचे गूढच असून आपण पंढरपूर येथे कसा पोहोचलो ते आपल्यालाच ठाऊक नाही, असे त्याने सांगितले आहे.
27 रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान वन विभागाच्या पाण्याच्या टँकरसाठी आपण वेदुमळ गेट उघडली. सदर रस्त्यावरून केवळ दुचाकीच जाऊ शकते. त्यानंतर नेमके काय घडले हे आपल्याला आठवत नाही. आपल्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका, मात्र आपण जे सांगत आहे ते सत्य सांगत आहे, असे काकुळतीच्या स्वरात त्याने सांगितले. 1 रोजी आपण शुद्धीवर आलो. त्यावेळी आपण पंढरपूर येथे पोहोचलो असल्याचे आपल्या निदर्शनास आले. आपण बसमध्ये कसा चढलो, तिकीट कोणी काढले, कोठे पोहोचलो याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. ज्यावेळी ध्वनिक्षेपकावरून काही तरी सूचना आपण ऐकल्या त्यावेळी आपल्या एका मित्राला आपण पंढरपूर येथे पोहोचलो असल्याचे कळविले. त्याच्या सांगण्यावरून आपण पंढरपूर येथेच एका हॉटेलमध्ये खोली घेतली, असे वेळीप याने या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मोबाईलवर श्री विठ्ठल, एकवीरा मंदिराची छायाचित्रे
आपल्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. परंतु आपल्याला आपले कुटुंब, बायको, मुलाची आठवण येत होते. पहिल्या दिवशी आपण एटीएममधून 10 हजार रु. काढले होते. त्यातील दीड हजार आपल्या खिशात होते. मात्रा सध्या आपला खिसा रिकामा आहे, असे वेळीप याने सांगितले. त्याच्या गळय़ात भारी किमतीची एक रूद्राक्षाची माळ आहे. शिवाय एक बॅग आणि त्यात काही कपडे आहेत. त्याच्या मोबाईलवर पंढरपूरच्या टेकडीवरील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे छायाचित्र त्याचप्रमाणे एकवीरा देवीच्या मंदिराचे छायाचित्र आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे छायाचित्र त्याने 1 रोजी दुपारी 12 च्या दरम्यान, तर एकवीरा देवीचे छायाचित्र संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान घेतले आहे. हे अंतर त्याने कसे कापले हा प्रश्न अनुत्तरित असाच आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे छायाचित्र आपण बसमधून घेतले. मात्र एकवीरा देवीचे छायाचित्र कोठे आणि कसे घेतले हे आपल्याला आठवत नसल्याचे त्याने सांगितले.
आपण बेपत्ता झाल्यानंतर गोव्यातील वनखाते, पोलीस, आपले कुटुंब, गावातील मंडळी, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्यासाठी खूपच मेहनत घेतली. याबद्दल आपल्याला खूपच वाईट वाटत आहे आणि या एकंदर प्रकाराने आपण लज्जित झालो आहे, असे वेळीप याने या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. आपल्या गळय़ातील रूद्राक्षाची माळ आपण कुटुंबियांनी केलेल्या सूचनेनुसार तशीच ठेवली आहे, असे सांगताना त्याचे डोळे भरून आले होते. एकंदर हे प्रकरण कोडय़ात टाकणारे असून निरीक्षक नाईक यांनी संयमीपणे त्याची जबानी घेऊन त्याला घरी पाठवून दिले आहे. जाताना आपल्यावर विश्वास ठेवा एवढेच वेळीप बोलून गेला.