ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोना लढ्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता खासदारांची 30 टक्के वेतन कपात करण्यात येणार आहे. अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.
याबद्दल अधिक माहिती देताना जावडेकर म्हणाले की, आर्थिक वर्ष 2020 – 21 या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. तूर्तास तरी हा निर्णय 12 महिन्यांसाठी घेतला गेला आहे.
या निर्णयानुसार आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्व खासदारांच्या पगारात कपात केली जाणार आहे. यामधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कोरोना विरोधात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी केला जाईल. यासंदर्भात केंद्र सरकार अध्यादेश काढणार आहे.
तसेच, खासदारांना मिळणारा विकास निधी दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना 5 कोटींचा विकास निधी दिला जातो. हा विकास निधी पुढील दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आला आहे. याचा उपयोग आता कोरोना लढ्यासाठी वापरला जाईल असेही जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.