ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासगी वेबसाईट narendramodi_in चे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सने यावरुन ट्वीट करत पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंडमध्ये क्रिप्टो करन्सीने दान देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याने लगेचच हे ट्विट डिलीट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 3.15 च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला. बिटकॉईनद्वारे कोरोना सहाय्यता निधी द्यावा अशी मागणी केली होती.
पंतप्रधानांच्या या अकाउंटला 25 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. जॉन विक या अकाउंटने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक केले होते. याबाबत बोलताना ट्वीटरकडून सांगण्यात आले की, याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती आणि सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घेण्यात आली होती. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. आणखी कोणती अकाउंट हॅक झाली का ? याबद्दल अधिक माहिती नसल्याचेही ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले.
याआधी देखील महत्वाच्या व्यक्तींची अकाउंट हॅक करण्यात आली होती. अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन, माजी अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अरबपती व्यावसायिक टायकून एलोन मस्क यांचे अकाउंट हॅक झाले होते.