ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 एप्रिल ) दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांना आज भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीचा दुसरा डोस दिला आहे. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून लस घेतानाची छायाचित्रे शेअर केली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा असे आवाहन देखील पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन ही लस टोचून घेतली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले आहेत.
एम्स रुग्णालयातील परिचारिका निशा शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांना लस दिली. त्या म्हणाल्या, आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीचा दुसरा डोस दिला. यावेळी त्यांनी आमच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांशी झालेली भेट ही आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.