23 रोजी ऑनलाईन कार्यक्रम
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील स्वयंपूर्ण मित्रांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ऑक्टोबर रोजी संवाद साधणार असून तो ऑनलाईन माध्यमाच्या स्वरुपात होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर माहिती दिली आहे.
गोवा सरकारतर्फे ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम राबविण्यात येत असून त्यात अनेक सरकारी कर्मचारी – अधिकारी यांना ‘स्वयंपूर्ण मित्र’ म्हणून नेमण्यात आले आणि त्यांना विविध कामे, जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. त्या मोहिमेतून अनेक उपक्रम सरकारने राबविले आहेत. त्या मित्रांशी मोदी बोलणार आहेत.
या संवादावेळी पंतप्रधान मोदी राज्यातील काही निवडक नागरिक, पंचायती, पालिका यांचे प्रतिनिधी यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत तसेच पंतप्रधानाच्या सोशल मीडिया खात्यावरुन या संवादाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. गोव्यातील जनतेला ते तेथून पाहता येणार आहे.
कोरोना पहिला डोसचे 100 टक्के लसीकरण झाल्याचा दावा राज्य सरकारने केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य यंत्रणा, कोरोना योद्धय़ांशी संवाद साधला होता. यावेळी ते गोव्यातील स्वयंपूर्ण मित्रांशी बोलणार आहेत.