अमेरिकेतून भारतात लँडिंग : ‘एअर फोर्स वन’च्या धर्तीवर व्हीव्हीआयपींसाठी बनवलेय विशेष विमान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी भारताने अमेरिकेतून दोन ‘एअर इंडिया वन’ विमाने मागवली होती. त्यापैकी पहिले विमान गुरुवारी देशात दाखल झाले. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. हे विमान दाखल झाल्यामुळे भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आता ‘एअर इंडिया वन’मधून परदेशात प्रवास करणार आहेत. या विमानांसाठी भारताने 2018 मध्ये बोईंग कंपनीशी करार केला होता.
‘एअर इंडिया वन’ विमानाची बांधणी अमेरिकेत करण्यात आली आहे. महनीय व्यक्तींच्या सुरक्षेच्या गरजेनुसार त्यात बदल करण्यात आले आहेत. ‘एअर इंडिया वन’ अत्याधुनिक आणि सुरक्षित संप्रेषण प्रणालीने सुसज्ज आहे. या विमानामुळे पंतप्रधानांच्या घट्ट विणलेल्या सुरक्षा यंत्रणेला अधिक बळ देण्यासाठी भारताला आता अमेरिकेच्या राष्ट्रांध्यक्षासारखे सुरक्षा विमान प्राप्त झाले आहे.
सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एअर इंडिया बी 747 या विमानाने प्रवास करतात. पंतप्रधान व इतर व्हीव्हीआयपी लोकांनी वापरलेल्या या विमानांना एअर इंडिया वन असे म्हटले जाते. यापूर्वी पंतप्रधान तसेच अन्य व्हीव्हीआयपी लोकांनी वापरलेले बी-747 विमान व्यावसायिक कामांसाठी वापरले जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ‘एअर इंडिया वन’ एक सुरक्षित, सुसज्ज आणि अत्याधुनिक असल्यामुळे हॅक किंवा टॅप न करता मध्यम हवा, ऑडीओ आणि व्हिडीओ संप्रेषण कार्याचा लाभ महनीय व्यक्तींना घेता येणार आहे.
अत्याधुनिक प्रणालीने सुसज्ज
एअर इंडिया वन हे विमान अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टिमने सुसज्ज आहे. पंतप्रधानांना विमानात बसून कुठल्याही अडथळय़ाविना कामकाज करता यावे, यासाठी या विमानात काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. विमान उड्डाणावस्थेत असताना ऑडीओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा यामध्ये आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या ‘एअर फोर्स वन’च्या धर्तीवर ‘एअर इंडिया वन’ची निर्मिती करण्यात आली आहे.
अंतर्गत सजावटही ‘फाईव्ह स्टार’
बोईंगने या विमानात काही बदल केले आहेत. खूप आकर्षक पद्धतीची अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. महनीयांसाठी विमानात एक मोठा सूट/केबिन असेल. छोटे मेडिकल सेंटरही असेल. पत्रकारांसाठी खास जागा असेल. इकोनॉमिक वर्गाची आसने फार कमी असतील. बहुतांश आसनेही बिझनेस क्लासची आहेत.
‘एअर इंडिया वन’ विमान सुरुवातीला एअर इंडिया स्वीकारेल. त्यानंतर इंडियन एअर फोर्सकडे हे विमान सोपवण्यात येईल. एअर फोर्सचे पायलट हे विमान हाताळण्यात पारंगत होत नाहीत, तोपर्यंत एअर इंडियाचे वैमानिक या विमान संचालनाच्या टीमचा एक भाग असतील. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड या विमानाची देखभाल करणार असल्याचे समजते.