आमदार सोपटे यांचे जीत आरोलकर यांना प्रत्युत्तर
पेडणे / प्रतिनिधी
मगो पक्षातील प्रवेश कार्यक्रमास परवानगीसाठी ज्या गोष्टींची पूर्तता करावी लागते ती जीत आरोलकर यांनी न केल्याने सरकारी यंत्रणा तसेच पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. त्याचे खापर आरोलकर यांनी आपल्यावर फोडू नये, असे प्रत्युत्तर मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिले.
मांदे येथे बुधवार दि. 18 रोजी आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला सोपटे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत मांदे भाजप मंडळ उपाध्यक्ष गोविंद आजगावकर व मंडळ सदस्य मिलिंद तळकर उपस्थित होते.
आजपर्यंत कधीही सुडाचे राजकारण केले नाही
आमदार सोपटे म्हणाले, आपण चार वेळा निवडून आलो. मात्र कधीही सुडाचे राजकारण केलेले नाही. जीत यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आपण विघ्न आणण्याचे काम केले नाही. पेडणे तालुक्मयातील व मांदे मतदारसंघातील जनता आपल्याला ओळखते. आपण गेली 22 वर्षे राजकारणात आहे. आजपर्यंत कधीही वाईट कृती केली नाही आणि यापुढेही करणार नाही.
जीत आरोलकर यांचे समर्थक देवेंद्र प्रभूदेसाई व राघोबा गावडे यांनी आपल्यावर बोलताना जीभेला लगाम घालावी. त्यांनी प्रवेश कार्यक्रमात आपल्यावर वैयक्तिक आरोप व आपल्या आरोग्यासंबधी टिप्पणी केली. त्यांनी आपल्यावर आरोप करतना भान ठेवावे. देवेंद्र देशप्रभू हे स्वतःला लिडर समजत असून त्यांना मांदे मतदारसंघात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 650 मते मिळाली यावरुन त्यांची लोकप्रियता कळते असे सोपटे म्हणाले.
कार्यकर्ते व मतदारांवर भरवसा
2022 मध्ये होणाऱया विधनसभा निवडणुकीत आपल्या मांदे मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर व मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या कार्यकर्ते व मतदाराच्या जीवावर 2022 जी निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी सोपटे यांनी बोलून दाखविला.
आमदार सोपटे म्हणाले, मांदे मतदार संघात जीत आरोलकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला 350 ते 400 जणांची उपस्थित होती. त्यातील 50 टक्के लोक हे बाहेरचे होते. त्यांना मतदारसंघात बाहेरील लोक घ्यावे लागतात. परंतु मला बाहेरील लोकांची गरज पडत नाही.