उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे युवकांना आवाहन
प्रतिनिधी /काणकोण
शेळी, पोळे येथील जितेंद्र फडते यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून मोठय़ा प्रमाणात भातशेती केली आहे. स्वतः तांत्रिक शिक्षण घेतलेल्या फडते यांनी पडीक जमिनीवर नवीन तंत्राचा वापर करून जो प्रयोग केलेला आहे त्याचे खास भेट देऊन उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी कौतुक केले. त्यांच्यासमवेत लोलये पोळेचे सरपंच सचिन नाईक, माजी सरपंच शैलेश पागी, निशांत प्रभुदेसाई, नगरसेवक शुभम कोमरपंत आणि अन्य उपस्थित होते. सरकार कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी खूप सहकार्य करत आहे. फडते यांनी कृषी क्षेत्राला नवीन चालना देतानाच आपल्याबरोबर अन्य चार-पाच जणांना रोजगार मिळवून दिलेला आहे. काणकोण तालुक्यात बऱयाच ठिकाणी अशा प्रकारची पडीक जमीन आहे. जमीनमालकांनी त्या जमिनी लीजवर युवकांना वापरायला द्याव्यात आणि युवकांनी सामूहिक तत्त्वावर त्या ठिकाणी भातशेती करावी, असे आवाहन फर्नांडिस यांनी यावेळी केले.