12 वर्षांनी ज्येष्ठ प्रतिस्पर्धीवर रोमांचक विजय, आणखी एक विजय मिळवल्यास किमान कांस्यपदक निश्चित, चेनविरुद्ध लढत
टोकियो / वृत्तसंस्था
भारतीय महिला बॉक्सर लोवलिना बोर्गोहेनने आपल्या पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये 69 किलोग्रॅम वजनगटात मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत जोरदार धडक मारली. तिने जर्मनीची अनुभवी प्रतिस्पर्धी नॅदिने अपेत्झला 3-2 अशा निसटत्या फरकाने मात दिली.
मुष्टियुद्धात भारतासाठी ही मंगळवारी एकमेव लढत होती आणि यात तिने बाजी मारण्यात अजिबात कसर सोडली नाही. वास्तविक, लोवलिनाची प्रतिस्पर्धी नॅदिने ही वयाने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. मात्र, या दोघीही येथे ऑलिम्पिक पदार्पण करत होत्या आणि लढतीत 23 वर्षीय लोवलिना सरस ठरली. लोवलिनाने अतिशय सरस, आक्रमक व दर्जेदार खेळ साकारत वर्चस्व गाजवले. स्प्लिट पॉईंट्सच्या आधारावर तिन्ही राऊंडमध्ये तिने आपला वरचष्मा कायम राखला.
35 वर्षीय ऍपेत्झ ही ऑलिम्पिक बॉक्ंिसगमध्ये पात्रता मिळवणारी पहिलीच जर्मन महिला ठरली. यापूर्वी तिने 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्य जिंकले असल्याने व ती माजी युरोपियन चॅम्पियन असल्याने येथे तिच्याकडून बऱयाच अपेक्षा होत्या. मात्र, ताज्या दमाच्या लोवलिनासमोर तिची फारशी मात्रा चालली नाही. ऍपेत्झ ही जर्मन मुष्टियुद्धातील आघाडीची ऍथलिट असून न्यूरोसायन्समध्ये ती पीएचडी देखील करत आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तिने मागील वर्षभरापासून संशोधन तात्पुरते स्थगित ठेवले आहे. ऍपेत्झने गतवर्षी युरोपियन क्वॉलिफिकेशन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत ऑलिम्पिकसाठी पात्रता संपादन केली होती.
मूळ आसामची लोवलिना पहिल्या फेरीत आक्रमक खेळ साकारण्यात यशस्वी ठरली आणि पुढेही तिने यात सातत्य राखले. डाव्या हाताने लगावलेल्या हूकवर लोवलिना बोर्गोहेनने अधिक वर्चस्व गाजवले.
लोवलिना बोर्गोहेन ही दोनवेळची वर्ल्ड व आशियाई चॅम्पियनशिप कांस्यजेती असून पुढील फेरीत तिची लढत चायनीज तैपेईच्या निएन-चिन चेनविरुद्ध होईल. निएन-चिन चेन चौथी मानांकित असून ती माजी वर्ल्ड चॅम्पियन देखील राहिली आहे. आता उभयतात दि. 30 रोजी उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. तेथे विजय मिळवल्यास लोवलिनासाठी किमान कांस्यपदक निश्चित होईल. चेन ही 2019 आशियाई चॅम्पियनशिपमधील रौप्यजेती असून उपउपांत्यपूर्व फेरीत तिने इटलीच्या अँजेला कॅरिनीवर 3-2 अशा फरकाने मात दिली.
बॉक्स (27 एसपीओ 05-मनू भाकर-सौरभ चौधरी)
पुन्हा भरकटला भारतीय नेमबाजांचा नेम!
10 मीटर्स एअर रायफल मिश्र सांघिक गटात 2 भारतीय जोडय़ांना पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आणि भारतीय नेमबाजांचा नेम भरकटल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. इलावेनिल व दिव्यांश सिंग पनवर यांना 3 सिरीजमध्ये 626.5 अंकांसह 12 व्या स्थानी तर अंजुम मोदगिल, दीपक कुमार यांना 623.8 गुणांसह 29 व्या स्थानी समाधान मानावे लागले. याशिवाय सौरभ चौधरी व मनू भाकर यांनाही अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविता आली नाही. मिश्र गटाचा यंदा प्रथमच ऑलिम्पिकमध्ये समावेश केला गेला आहे.
इलावेनिल व दिव्यांश यांच्यासाठी फारशी चांगली सुरुवात झाली नाही आणि अंजुम व दीपक पहिल्या काही सिरीजमध्येच पिछाडीवर फेकले गेले. अव्वल 8 संघ क्वॉलिफिकेशन-2 मध्ये पोहोचले आणि दुसऱया सत्रात त्यातील 4 संघ फायनलसाठी पात्र ठरले. पहिल्या क्वॉलिफिकेशनमध्ये 10 शॉट्सचे 3 सिरीज होते.
बॉक्स (27 एसपीओ 04-सात्विक-चिराग शेट्टी)
बॅडमिंटनमध्ये चिराग-सात्विक विजयानंतरही बाद फेरीतून बाहेर
चिराग शेट्टी व सात्विकराज रणकिरेड्डी यांना इंग्लंडच्या बेन लेन व सीन व्हेन्डीविरुद्ध शेवटच्या साखळी फेरीत दमदार विजय मिळवल्यानंतरही बाद फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीने 18 व्या मानांकित इंग्लिश जोडीला 21-17, 21-19 असे पराभूत केले. ही लढत केवळ 44 मिनिटात निकाली झाली. मात्र, अ गटात यानंतरही तिसऱया स्थानी राहिल्याने त्यांना उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही.
या गटात इंडोनेशियाच्या मार्कस गिडेऑन व केव्हिन सुकामुल्जो यांनी अव्वलस्थान मिळवले तर चायनीज तैपेईच्या यांग ली आणि ची-लिन वँग यांनी दुसरे स्थान संपादन करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. साखळी फेरीअखेर इंडोनेशिया, चायनीज तैपेई व भारताचे 2 विजयांसह समान गुण राहिले आणि यानंतर जिंकलेल्या गेम्सचा निकष लावला गेला, त्यावेळी भारत पिछाडीवर फेकला गेला.
भारतीय जोडी कोर्टवर उतरली, त्याचपूर्वी ली व वँग यांनी इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध 3 गेम्समध्ये विजय मिळवत भारत-इंग्लंड यांच्यातील लढत औपचारिक असेल, हे सुस्पष्ट केले होते. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ या इव्हेंटमध्ये उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.
बॉक्स (27 एसपीओ 03-शरथ कमल)
झुंजार लढतीनंतर शरथ कमल ऑलिम्पिकमधून बाहेर
भारताचा आघाडीचा टेबलटेनिसपटू शरथ कमलने लिजेंडरी मा लाँगविरुद्ध अपयशी ठरला असला तरी त्याने या अव्वल प्रतिस्पर्ध्याला किंचीत झगडणे भाग पाडले आणि हाच शरथचा नैतिक विजय ठरला. शरथला 7-11, 11-8, 11-13, 4-11, 4-11 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. शरथच्या पराभवासह भारताचे टेबलटेनिसमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
यापूर्वी, 2018 आशियाई स्पर्धेत भारताने प्रथमच पदक जिंकले, त्यावेळी मनिका बात्रा व शरथ कमल यांची कामगिरी लक्षवेधी ठरली होती. या जोडीने येथे तिसऱया फेरीत धडक मारत तीच यशस्वी घोडदौड येथेही कायम राखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर यात फारसे काही साध्य झाले नसल्याचे स्पष्ट झाले.
46 मिनिटे चाललेल्या या लढतीत 39 वर्षीय शरथने पहिल्या 3 गेम्समध्ये अधिक संघर्षमय खेळ साकारला. लाँगसारख्या कसलेल्या खेळाडूवर दडपण राखता आले, हे शरथसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. मनिका, सुतिर्था, जी. साथियन यांना एकेरीतून यापूर्वीच पराभव पत्करावे लागले आहेत.
बॉक्स (दीपिका, प्रवीण जाधव)
भारतीय तिरंदाजांसाठी आज शेवटची संधी
सांघिक गटातील अपयश मागे सारत वैयक्तिक गटात यश खेचून आणण्यासाठी भारतीय तिरंदाजांकडे आज (बुधवार दि. 28) शेवटची संधी असणार आहे. अर्थात, वैयक्तिक गटातही कडवे आव्हान असल्याने येथे पदक जिंकण्यासाठी भारतीय क्रीडापटूंना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. वैयक्तिक गटात पोडियम फिनिशकरिता किमान 5 विजय मिळवावे लागतात तर सांघिक गटात पदक जिंकण्यासाठी 3 सिरीज विजय पुरेसे ठरत असतात.
आतापर्यंत एकाही भारतीयाला प्री-क्वार्टरफायनलचा अडथळा पार करता आला नाही. मात्र, असा चमत्कार घडला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. सलग तिसऱयांदा ऑलिम्पिक प्रतिनिधीत्व करत असलेल्या दीपिका कुमारीवर भारताची मुख्य भिस्त असेल. याशिवाय, नवोदित प्रवीण जाधव येथे आपले नशीब आजमावेल. रशियाच्या जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित गॅल्सनला सामोरे जाताना प्रवीण जाधवसाठी सातत्य हीच यश खेचून आणण्यासाठी गुरुकिल्ली ठरु शकते. अतानू दास आपल्या पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या डेंग यू-चेंगचा सामना करेल.
लष्करी सेवेतील अनुभवी तरुणदीप रायसाठी ही शेवटची ऑलिम्पिक असल्याने येथे तो भावनिक किनारही अनुभवेल. त्याची लढत युक्रेनच्या ओलेक्सी हनबिनविरुद्ध होणार आहे.
भारताचे टेनिसमधील आव्हान समाप्त
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील टेनिस या क्रीडाप्रकारातील भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि सुमीत नागल या जोडीला मिश्र दुहेरीत 153 मानांकन मिळाले. पण हे गुण पात्रतेपेक्षा कमी असल्याने सानिया आणि सुमीत यांना मिश्र दुहेरीच्या प्रकारात सहभागी होता येणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. मिश्र दुहेरीच्या प्रकारात एकूण 16 संघांचा समावेश आहे. केवळ दोन सामने जिंकणारा संघ पदक फेरीत दाखल होईल.