चंद्रकांतदादा पाटील यांचा नवा इरादा
प्रतिनिधी/पुणे
प्रत्येकाला पुण्यात सेटेल व्हावे असेच वाटते. मात्र, मी कायम पुण्यात राहणार नाही. देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार आहे. माझ्या विरोधकांना हे सांगून टाका, अशा शब्दांत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी आपला इरादा स्पष्ट केला.
संस्कृती प्रतिष्ठान आयोजित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त `अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथील प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, वैशाली माशेलकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सुनील महाजन आदी उपस्थित होते.
गिरीश बापट त्यांच्या भाषणात म्हणाले, दादा, जगात काही झाले; तरी त्याचा संबंध पुणेकर स्वतःशी जोडतात. देवेंद्र फडणवीस यांचे काका पुण्यात असल्याने त्यांचाही संबंध जोडतात. तसेच डॉ. माशेलकर हे गोवा, मुंबई येथे राहिले असले, तरी ते आता पुणेकरच झाले आहेत.
हाच धागा पकडून `प्रत्येकाला पुण्यात सेटेल व्हावे, असेच वाटते,’ असे चंद्रकांतदादा म्हणताच सभागृहात उपस्थितांनी मोठÎाने हसत टाळÎा वाजविण्यास सुरूवात केली. मात्र, मी परत कोल्हापूरला जाणार, असे स्पष्ट करीत दादांना सर्वांनाच धक्का दिला.
चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकली. तेव्हापासून त्यांच्यावर ते बाहेरचे आहेत, असा आरोप केला जातो. पाटील यांनी वेळोवेळी त्यांचा पुण्याशी संबंध कसा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही पाटील यांना कोल्हापूरवरून आल्याचे वारंवार ट्रोल केले जाते. त्यातच आज पुण्यात मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.