बेळगाव / प्रतिनिधी
परिवहन महामंडळाच्या आयुर्मान संपलेल्या बसगाडय़ा भंगारात जमा केल्या जातात. दरवषी 10 लाख किलोमीटर धावलेल्या व बॉडी खराब झालेल्या बस भंगारासाठी पाठविल्या जातात. ऑटोनगर येथील वायव्य परिवहन महामंडळाच्या तांत्रिक विभागात अशा 73 बसची नोंद झाली आहे. दरवर्षी आयुर्मान संपलेल्या बस भंगारात (स्क्रॅप) काढण्यात येतात. विभागात भंगार बस, टायर, टय़ूब, पाटे व इतर साहित्यांनी भंगार फुल्ल झाले आहे. भंगाराच्या साहित्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच भंगाराच्या साहित्याची उचल होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रण अधिकाऱयांनी दिली आहे.
बेळगाव विभागाच्या ताफ्यात हजारो बसेस आहेत. त्यातील 71 हून अधिक बसेसचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे विभागातील बसची संख्याही कमी झाली आहे. परिणामी परिवहनला सुरळीत बससेवेसाठी नवीन गाडय़ा खरेदी कराव्या लागणार आहेत. कोरोनामुळे बेळगाव विभागाचे 110 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नवीन बस खरेदी करायला परिवहनच्या तिजोरीत पैसे शिल्लक नाहीत. भंगारासाठी आलेल्या गाडय़ांचे महत्त्वाचे भाग काढून घेऊन नंतर ऑटोनगर येथील वर्कशॉपमध्ये या गाडय़ा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी भंगारातील बसची संख्या वाढली असून नवीन येणाऱया बसगाडय़ांसाठी जागा अपुरी पडत आहे. भंगाराच्या बसगाडय़ांतून परिवहनला लाखोंचे उत्पन्न मिळते. मात्र कोरोनामुळे निविदा प्रक्रिया लांबणीवर पडल्याने भंगाराच्या गाडय़ा जागेवर पडून आहेत.
भंगारातील 71 पैकी 43 बसगाडय़ांची विक्री
बेळगावमधील चार आगारांसह बैलहेंगल, खानापूर, रामदुर्ग या सात आगारांतील वयोमर्यादा संपलेल्या बसेस भंगारात जमा केल्या जातात. अशा बसगाडय़ांसाठी ठराविक काळानंतर निविदा काढली जाते. निविदा प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडते. सध्या निविदा प्रकियेनुसार भंगारात असलेल्या 71 पैकी 43 बसगाडय़ांची विक्री झाली असून येत्या दहा-पंधरा दिवसात या बसगाडय़ा घेऊन जाणार असल्याची माहिती ऑटोनगर येथील तांत्रिक विभागातून उपलब्ध झाली आहे.
कोरोनाआधी म्हणजे जानेवारी महिन्यात भंगारातील 20 हजार टायरची विक्री झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर भंगारातील कोणत्याच साहित्याची विक्री न झाल्याने साहित्य जागेवर पडून आहे. भंगारात नवीन येणाऱया बसेससाठी जागा अपुरी पडत आहे.