बससेवा ठप्प, परिवहन अडचणीत, बसस्थानक सुनसुने
बेळगाव / प्रतिनिधी
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात क्लोजडाऊनचा नियम जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून सर्व प्रकारची बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे परिवहनच्या बेळगाव विभागाला दैनंदिन 60 लाखांचा फटका बसत आहे. शिवाय पुढील दहा दिवस बससेवा बंद राहणार असल्याने परिवहनसमोर अडचणी वाढल्या आहेत. तर बेळगाव व चिकोडी विभागाला तब्बल कोटय़ावधींचा फटका बसला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्रीपासून सर्व प्रकारची बससेवा ठप्प झाली आहे. शिवाय परिवहन मंडळाच्या स्थानिक बसेससह लांबपल्ल्याच्या सर्व बस जाग्यावरच थांबून राहिल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
बेळगाव आगारातून दरारोज स्थानिक बसेससह लांबपल्ल्यासाठी धावणाऱया निपाणी, कोल्हापूर, संकेश्वर, इचलकंरजी, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, कराड, मुंबई, धारवाड, हुबळी, मंगळूर, बेंगळूर, गोवा, चिपळूण, विजापूर, हैद्राबाद आदी बससेवा ठप्प झाली आहे. बेळगाव विभागात एकूण सात आगार असून बेळगाव विभागातील चार आगारासह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या आगारातून धावणाऱया हजारो बस थांबून आहेत. बेळगाव विभागातून दैनंदिन दीड हजार बस विविध मार्गांवर धावतात त्यामुळे महसूलही मोठय़ा प्रमाणात मिळतो. मात्र संपामुळे पंधरा दिवस बससेवा ठप्प झाली होती. तर आता क्लोजडाऊनमुळे बस बंद असल्याने परिवहनच्या महसूलावर पाणी फिरले आहे.
बेळगाव विभागातून महाराष्ट्र व गोवा राज्यांत धावणाऱया बसची संख्या अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र व गोव्यात धावणाऱया बस माध्यमातून बेळगाव विभागाला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळत असते. मात्र क्लोजडाऊनमुळे आंतरराज्य बससेवा देखील बंद असल्याने उत्पन्न थांबले आहे. शिवाय पर्यटनस्थळे देखील बंद असल्याने परिवहनला उत्पन्नापासून वंचित रहावे लागले आहे.