परिवहन कार्यालयासभोवती उभे केले व्यावसायिक गाळे : ई-निविदा लवकरच
प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन महामंडळाला कोरोना काळात मोठा फटका बसला असून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उत्पन्न वाढीचे वेध लागले आहेत. त्यासाठी आरटीओ सर्कल येथील परिवहन कार्यालयाच्या सभोवती व्यावसायिक गाळे उभारले आहेत. या व्यावसायिक गाळय़ांसाठी ई-निविदा प्रकिया राबविण्यात येणार असून हे गाळे भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.
कोरोना काळात बेळगाव विभागाचे तब्बल 110 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्लॉकनंतरही अपेक्षेप्रमाणे उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे परिवहन अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीमध्ये परिवहनने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य परिवहन महामंडळाने आता या कुरियर सेवेला प्रारंभ केला आहे. ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने परिवहनने ही सेवा सुरू केली आहे. बेळगाव विभागाने उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने आरटीओ कार्यालयाच्या समोर व्यावसायिक गाळे उभे केले आहेत.
कोरोनामुळे झालेले नुकसान भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱया गाळय़ांच्या माध्यमातून भरून काढण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी 29 गाळे उभारले आहेत. या भागात आरटीओ व परिवहन मंडळाचे कार्यालय असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे या गाळय़ांना मागणी वाढेल अशी अपेक्षा परिवहनला आहे. या गाळय़ांच्या माध्यमातून झालेले नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे.
परिवहनला आर्थिक बळकटी देण्यासाठी या गाळय़ांची उभारणी केली आहे. परिवहन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी विविध पर्याय अवलंबत असून आता गाळे भाडेतत्त्वावर देणार आहेत. मार्चच्या अखेरीस या गाळय़ांसाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.