नंदकुमार तेली/कोल्हापूर
परिस्थीतीवर मात करून कोल्हापूरातील नेहा संदीप माने हिने चक्क मिस्त्री बनली आहे. ती सध्या एखाद्या मुलाप्रमाणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पडत असून दुचाकी दुरूस्तीच्या कामाच्या उत्पन्नातून आर्थिक हातभार लावत आहे. आपले स्वतःचे दुचाकी दुरूस्तीचे सेंटर उभारण्याचा नेहाने संकल्प केला असून यासाठी अनुभवी व तज्ञ गॅरेजचे मालक अमोल सरनाईक यांचे गेल्या दोन वर्षांपासून तिला मागदर्शन लाभत आहे.
शिक्षणाबरोबर दुचाकी दुरूस्तीच्या कामात व्यस्त
नेहा शिक्षणाबरोबर दुचाकी दुरूस्तीच्या बारकाव्यांचे धडे गिरवित आहे. सध्या नेहा कोणतीही दुचाकी संपूर्ण खोलून जोडण्यात तरबेज बनली आहे. शिवाजी पेठेतील फिरंगाई मंदिराच्या शेजारी अमोल सरनाईक यांचे दुचाकी वाहन दुरूस्तीचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये सध्या त्यांच्यासह सुमारे 6 मुले वाहन दुरूस्तीचे काम करतात. या सात पुरूषांमध्ये नेहाने एकटी असून तिने दुचाकी वाहन दुरूस्तीचे ज्ञान अवगत केले आहे. त्यांच्या बरोबरीने तिही सकाळी साडे आठ ते रात्री आठ या वेळेत दुचाकी दुरूस्तीचे काम करत असून कॉलेजचे शिक्षणही सुरू ठेवले आहे.
दुचाकी वाहन संपूर्ण खोलून जोडण्यात नेहा बनली तरबेज
तिने किमान कौशल्यावर आधारीत असणारा ऍटो मोबाईल (एमसीव्हीसी) कोर्स पूर्ण केला असून सध्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. नेहाने शिक्षण आणि कामाचा वेळ याचा तिने नियंत्रित ताळेबंद आखला असून स्वः गॅरेजचे लक्ष ठेवले आहे. कॉलेज, गॅरेज व घर अशी तिची दिनचर्याच बनली असून आई व वडीलांचेही तिला प्रोत्साहन मिळाले आहे. एकुलती एक असूनही तिला मुलाप्रमाणे संगोपन केले आहे. वडील संदीप हे खासगी नोकरीत असून त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नेहाने आपल्या कुटुंबाला मुलांप्रमाणे आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी पार पाडत आहे. गेल्या दोन वर्षांपूसन तिचा मिस्त्री कामाचा खडतर प्रवास सुरू ठेवला आहे. सध्या नेहा कोणतीही दुचाकी गाडी लुमॅटिक इलेक्ट्रीक एअर कॉम्प्रेसर गनव्दारे संपूर्ण खोलून जोडण्यात तरबेज बनली आहे.