प्रतिनिधी/ पर्वरी
पर्वरी मतदारसंघातील महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्यावर वाढलेली झाडे – झुडपे आणि काही लोकांकडून टाकण्यात आलेल्या कचऱयामुळे बनलेल्या गलिच्छ परिसराची साफसफाई करण्याची मोहीम आमदार रोहन खंवटे यांनी पर्वरी रायझिंग व पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीतर्फे शनिवार 28 रोजी हाती घेतली.
सर्व्हिस रस्त्यामुळे पर्वरीवासियांना पणजीकडे सुरक्षितपणे जाण्याची सोय झाली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथमुळे ज्येष्ठ नागरीक संध्याकाळी कठडय़ावर बसून विरंगुळा घालवितात. तसेच या परिसरातील महिला, तरुण – तरुणी संजवेळी फेरफटका मारुन दिवसभराचा क्षीण घालवितात. या सर्व्हिस रस्त्याचा उपयोग सर्व थरातील लोकांना होतो.
या सर्व्हिस रस्त्यावर वीजेची सोय व परिसर स्वच्छ राखण्यासाठी वीज खाते व जीएसआयडीसी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार रोहन खंवटे यांनी बोलताना केला. स्वच्छ आणि हिरवीगार पर्वरी हे आमचे ध्येय आहे. या रस्त्यावर नागरिकांच्या सोयीसाठी विजेचे दिवे बसविण्यासाठी वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायतीचे माजी सरपंच गुरुनाथ वेर्णेकर म्हणाले की, सरकारी यंत्रणा स्वच्छता मोहीम हाती घेण्यास असमर्थता दाखवित असल्याचा आरोप केला. सरपंच स्वप्नील चोडणकर, जि. प. गुपेश नाईक, पंचसदस्य शाम कामत, शालू गुप्ता, साल्वादोर – दु – मुन्द पंचायतीच्या उपसरपंच मनिषा नाईक, सफर फडते यांनी मोहिमेत भाग घेऊन हातभार लावला. सफाई मोहिमेत जेसीबी यंत्र, सफाई कामगारांचा सहभाग होता.