प्रतिनिधी / सातारा :
पशुधन पर्यवेक्षक/ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. याअंतर्गत राज्यातील चार हजार शासकीय पशुधन पर्यवेक्षक व सहा पशुधन विकास अधिकारी बेमुदत संपावर गेले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील 113 पशुवैद्यकीय दवाखान्याचे (श्रेणी-2) कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद घोरपडे, डॉ. नितीन चव्हाण, डॉ. बलदेव निकत, डॉ. वैशाली इदे, डॉ. कांबळे, डॉ. भिसे, डॉ. लेंडाळ, डॉ. भोईटे व डॉ. म्हेत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा अंतर्गत राज्य सुधारणा विधेयकाद्वारे व्यावसायिक नोंदणी देऊन संरक्षण देणे, पशुधन विकास अधिकारी गट-अ सेवाप्रवेश निममाता पदवीका प्रमाणपत्र धारक पशुवैद्य संवर्गातील कर्मचाऱ्यांना गट-अ संवर्गात कोटा कायम ठेवणे, सुधारीत वेतन देण्यात यावे, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या धरतीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजुर करावा, विमा सुरक्षा कवच आदी मागन्यांकरीता हा बंद पुकारण्यात आला आहे.