ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
बलात्काराच्या आरोपीकडून 35 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अहमदाबादमध्ये एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.
श्वेता जडेजा असे अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शनिवारी तिला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जडेजा या अहमदाबाद पश्चिमच्या महिला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. अहमदाबादच्या एका खासगी कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. घटनेच्या तपासादरम्यान जडेजा यांनी आरोपी केनल शाह याच्याकडे कठोर कारवाई न करण्यासाठी 35 लाख रुपयांची लाच मागितली.
वाटाघातीअंती आरोपीचा भाऊ भावेश शाह आणि जडेजा यांच्यात 20 लाख देण्याचे ठरले. तिसऱ्या व्यक्तीकडून जडेजा यांनी ही लाच स्वीकारली. त्यानंतर जडेजा यांनी पुन्हा 15 लाखांची मागणी केली. त्यावेळी आरोपी केनल शाह यांनी जडेजा यांच्याविरोधात गुन्हे शाखेत तक्रार दिली.