वृत्तसंस्था/ लॉसेन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पहिल्या विश्वचषक पुरुष आणि महिलांच्या हॉकी फाईव्ज स्पर्धेचे यजमानपद ओमानला मिळाले आहे. सदर स्पर्धा 2024 जानेवारीमध्ये घेतली जाणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत आणि पाकनेही आपली तयारी दर्शविली होती. पण ओमानने यजमानपदाच्या शर्यतीत या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
सदर स्पर्धा ओमानची राजधानी मस्कत येथे खेळविली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीची बैठक गुरुवारी झाली आणि या बैठकीमध्ये यजमानपदासाठी ओमानची निवड करण्यात आली. यजमानपदाच्या शर्यतीमध्ये ओमान, भारत, पाक आणि सिंगापूर यांचा समावेश होता. या पहिल्या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांचा समावेश राहिल. प्रत्येक खंडातून तीन संघ आणि यजमान ओमान यांचा यामध्ये समावेश आहे. या पहिल्या विश्वचषक हॉकी फाईव्ज स्पर्धेसाठी आंतरखंडीय पात्र फेरीची स्पर्धा 2022 साली घेतली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी क्षेत्राला अधिक उत्तेजन मिळावे या हेतूने ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे आयोजित केली आहे. फाईव्ह ए साईड पद्धतीने हॉकी स्पर्धा घेतली जाणार असून यामध्ये जगातील सुमारे 70 देश सहभागी होणार आहेत. 2018 साली अर्जेंटिनामध्ये झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी फाईव्ज या प्रकाराला चाहत्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.