वृत्तसंस्था/ मँचेस्टर
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पाकविरुद्ध यजमान इंग्लंड संघाची पहिल्या डावात घसरगुंडी झाली आहे. शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी इंग्लंडने 8 बाद 172 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी पाक संघाने पहिल्या डावात 326 धावा केल्या आहेत.
यजमान इंग्लंडने अलीकडेच मायदेशात विंडीजविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. पण पाकविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात इंग्लंडला आपले वर्चस्व राखता आले नाही. पाकने पहिल्या डावात 326 धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज शान मसूदने 18 चौकारांसह 156, बाबर आझमने 11 चौकारांसह 69 तर शादाब खानने 3 चौकारांसह 45 धावांचे योगदान दिले. इंग्लंडतर्फे ब्रॉड, आर्चर यांनी प्रत्येकी 3, तर वोक्सने 2, अँडरसन व बेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
पाकने इंग्लंडच्या पहिल्या डावात भेदक गोलंदाजी केली. इंग्लंडने 4 बाद 92 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवसाला प्रारंभ केला. पॉपने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 117 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 62 धावा जमविल्या. तो पाचव्या गडय़ाच्या रूपात तंबूत परतला. पॉप आणि बटलर यांनी पाचव्या गडय़ासाठी 65 धावांची भागीदारी केली. उपाहारावेळी इंग्लंडने 52 षटकात 5 बाद 159 धावांपर्यंत मजल मारली होती. बटलर 38 तर वोक्स 15 धावांवर खेळत होते. पाकतर्फे मोहम्मद अब्बासने 2 तर आफ्रिदी, नसीम शहा, यासीर शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव- 109.3 षटकात सर्वबाद 326 (शान मसूद 156, बाबर आझम 69, शादाब खान 45, ब्रॉड 3-54, आर्चर 3-59, वोक्स 2-43, बेस 1-74, अँडरसन 1-63).
इंग्लंड प. डाव- 52 षटकात 5 बाद 159 (पॉप 62, बटलर खेळत आहे 38, वोक्स खेळत आहे 15, बर्न्स 4, सिबेली 8, रुट 14, स्टोक्स 0, मोहम्मद अब्बास 2-33, शाहीन आफ्रिदी 1-38, नसीम शहा 1-37, यासीर शहा 1-41).
(धावफलक उपाहारापर्यंत).