प्रतिनिधी / वास्को
आपल्याच घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली कोसळल्याने हेडलॅण्ड सडय़ावरील एका अल्पवयीन मुलीला मृत्यू आला. मयत मुलीचे नाव जानव्ही सातार्डेकर(15) असे असून ही मुलगी सडय़ावरील लक्ष्मीनारायण मंदिराजवळच्या भागात राहणाऱया कुटुंबातील आहे.
मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलगी आपल्याच घराच्या पहिल्या मजल्यावर काही कामानिमित्त गेली होती. या मजल्यावर घराचे अतिरीक्त काम चालू आहे. या ठिकाणी ती अपघाती खाली कोसळली. दुपारी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. तीला प्रथम चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, ती वाचू शकली नाही. तीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तीला मृत्यू आला. सदर मुलगी सडय़ावरील एका शाळेत शिकत होती. तीच्या पश्चात आई वडिल व भाऊ आहे. सदर मुलीच्या अपघाती मृत्यूमुळे सडा परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शवविच्छेदन सोपस्करानंतर मुरगाव पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. संध्याकाळी तीच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मुरगावचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजीद पिल्ले या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.