द्वितीय विजेता ठरला मानव मोरे
वार्ताहर /देवगड
राज्यातील पहिली समुद्री मॅरेथॉन 30 किमी अंतराची स्पर्धा वाघोटन-विजयुदुर्ग खाडीमध्ये घेण्यात आली. या पहिल्या समुद्र मॅरेथॉन स्पर्धेत मुलींच्या गटातून फास्टेस्ट स्विमर म्हणून नाव कोरलेल्या कोल्हापूरच्या सुबिया मुल्लाणी हिने 30 किमी अंतर अवघ्या 05 तास 13 मिनिटांमध्ये पूर्ण केले तर मुलांच्या गटातून पहिला तर या स्पर्धेतील दुसरा क्रमांक पटकावलेला ठाण्याचा मानव मोरे याने अवघ्या 05 तास 25 मिनिटेमध्ये 30 किमी अंतर पूर्ण केले. स्पर्धेची सुरुवात मालपे येथून करीत विजयदुर्ग बंदरावर त्याची सांगता झाली.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या कोरोना महामारीच्या सुधारित आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळत श्री दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग (रजि.) व ग्रामपंचायत विजयदुर्ग आयोजित जिम स्वीम ऍकॅडमी कोल्हापूर पुरस्कृत महाराष्ट्र राज्यातील पहिली समुद्री मॅरेथॉन 30 कि.मी. स्पर्धा 2021 मंगळवारी विजयदुर्ग वाघोटन खाडीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद तसेच देशातील अन्य भागातील नामवंत जलतरणपटूंनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील पहिली 30 कि.मी. अंतराची ही स्पर्धा सकाळी सात वाजून 25 मिनिटांनी मालपे गावातून सुरू करण्यात आली. मालपे सरपंच सादिक डोंगरकर, देवगड पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाळेकर यांनी शिट्टी वाजवून स्पर्धेला हिरवा कंदील दाखविला. स्पर्धेचे अंतिम ठिकाण विजयदुर्ग बंदर (विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी) हे होते.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे. पुरुष गटात प्रथम मानव राजेश मोरे (ठाणे)-5 तास 21 मिनिटे, द्वितीय क्रमांक आयुष तावडे-5 तास 56 मिनिटे, तृतीय गुरुप्रसाद मोरे-06 तास 07 मिनिटे तर महिला गटातः-प्रथम क्रमांक सुबिया राहिमखान मुल्लाणी (कोल्हापूर)-5 तास 13 मिनिटे, द्वितीय क्रमांक श्रावणी रणखांब (उस्मानाबाद)- 6 तास 28 मिनिटे, तृतीय क्रमांक श्रीमती श्यामला गोली (तेलंगणा)-6 तास 35 मिनिटे.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजतागायत एवढय़ा भव्य स्वरूपात लांब पल्ल्याची समुद्री जलतरण स्पर्धा झालेली नाही. मात्र, हे सौभाग्य आमच्या विजयदुर्ग गावाला श्री दुर्गामाता कला-क्रीडा मंडळ, विजयदुर्ग (रजि.) व जिम स्वीम ऍकॅडमी कोल्हापूर यांच्यामुळे प्राप्त झाले आहे, असे सांगितले. सभापती पाळेकर यांनी विजयदुर्ग हे गाव ऐतिहासिक वारसा लाभलेले व पर्यटनदृष्टय़ा अतिशय महत्वाचे असे आहे. विजयदुर्ग हे नाव आज ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला या वास्तुमुळे जगप्रसिद्ध आहे. याच किल्ल्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली विजयदुर्ग-वाघोटन खाडी देखील सुंदर व पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची आहे. विजयदुर्गकडे पर्यटक तसेच जलतरणपटू आकर्षित व्हावे, याच उद्देशाने ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेतील जलतरणपटूंची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी देवगड पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर, मंडळाचे अध्यक्ष आनंद देवरुखकर, सचिव संजना आळवे, खजिनदार रविकांत राणे, विजयदुर्ग सरपंच देवधर, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे पदाधिकारी राजेश मोरे, मंडळाचे कार्याध्यक्ष प्रथमेश धुरी, जिम स्वीम ऍकॅडमीचे अजय पाठक, तसेच मंडळाचे पदाधिकारी-सदस्य आणि विजयदुर्ग ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते.
स्पर्धेसाठी आरोग्य विभाग सिंधुदुर्गच्यावतीने तीन रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह उपस्थित होती. स्पर्धकांची सुरक्षितता म्हणून प्रत्येक स्पर्धकांसोबत सुरक्षितता साहित्यासोबत एक लाईफ गार्ड उपस्थित होते. त्याशिवाय तीन यांत्रिक स्पीड बोट डॉक्टरांसमवेत तैनात करण्यात आल्या होत्या.
या भव्य अशा स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून कैलास आखाडे, नीळकंठ आखाडे यांनी काम पाहिले. स्पर्धा सुरू असताना विजयदुर्ग-वाघोटन-मालपे खाडीच्या दुतर्फा गावातील ग्रामस्थ व शाळकरी मुले मोठय़ा संख्येने स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजयदुर्ग ग्रामपंचायत, एमएमबी कार्यालय विजयदुर्ग, विजयदुर्ग पोलीस ठाणे, विजयदुर्गमधील स्थानिक बोटी मालक, मणचे-मालपे येथील बोटी मालक यांनी सहकार्य केले. आभार रविकांत राणे यांनी व्यक्त केले.