वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
पाकचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर गेला आहे. दरम्यान या दौऱयासाठी निवडण्यात आलेल्या पाक संघातील आतापर्यंत सात क्रिकेटपटू कोरोना बाधित आढळले आहेत.
पाक संघातील सर्फराज अहमद, रोहेल नझीर, नसीम शहा, मोहम्मद अब्बास, अबीद अली आणि दानीश अझीझ या सहा क्रिकेटपटूंची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि हे सर्वजण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. 24 नोव्हेंबर रोजी पाक संघाचे न्यूझीलंडमध्ये आगमन झाल्यानंतर कोरोनाची पहिली चांचणी घेण्यात आली होती. पाक संघातील आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाली असून या खेळाडूचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
ख्राईस्टचर्चमध्ये पाकच्या क्रिकेटपटूंसाठी आयसोलेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण पाक संघाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. पाकचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर तिसऱयादिवशी पाक संघातील काही क्रिकेटपटूंची कोरोना चांचणी घेण्यात आली. पाक संघाचे साहाय्यक प्रशिक्षक शाहीद अस्लम सध्या ऑकलंडमधील 14 दिवसांच्या कालावधीकरिता क्वारंटाईनमध्ये दाखल झाले आहेत. क्वारंटाईन मुदत संपल्यानंतर ते पाक संघात दाखल होतील. या दौऱयात पाक आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सामने 18, 20, 22 डिसेंबर रोजी अनुक्रमे ऑकलंड, हॅमिल्टन आणि नेपियर येथे खेळविले जाणार आहेत. या मालिकेनंतर उभय संघात दोन कसोटी सामने होणार असून पहिली कसोटी 26 ते 30 डिसेंबर आणि दुसरी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहेत.