इम्रान यांच्या मित्रांचा तेल अवीव दौरा
इस्लामाबाद
इस्रायलला मान्यता देण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांचे मित्र लॉबिंग करत असल्याचा आरोप पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आरिफ अहमद भट्टी यांनी केला आहे. इम्रान यांचे एक जवळचे मित्र इस्लामाबादमध्ये इस्रायलसाठी लॉबिंग करत असल्याचे भट्टी यांनी सांगितले आहे. इम्रान यांचा एक सहकारी इस्रायलच्या दौऱयावर गेला होता. या सहकाऱयाकडे अन्य एका देशाचे नागरिकत्व असल्याचे समजते.
अमेरिका आणि एक देश इस्रायलला मान्यता देण्यासाठी दबाव आणत आहे, परंतु आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. पॅलेस्टाईनला इस्रायलकडून मान्यता मिळेपर्यंत याविषयी विचार करणार नसल्याचे इम्रान यांनी सांगितले होते.
संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन, सूदान तसेच मोरक्कोने इस्रायलला मान्यता दिली आहे. सौदी अरेबियाही लवकरच यासंबंधी निर्णय घेणार असल्याचे मानले जात आहे. संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानी नागरिकांसाठी कामकाजाचा व्हिसा प्रदान करणे रोखले आहे. या दणक्याने हादरलेल्या इम्रान सरकारने गुरुवारी विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांना संयुक्त अरब अमिरातमध्ये पाठविले आहे. कुरैशी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर संयुक्त अरब अमिरातचा मंत्री तसेच अधिकारी उपस्थित नव्हता.