वृत्तसंस्था/ लाहोर
कोरोना व्हायरस महामारीमुळे पाकमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने पाकमधील महिला क्रिकेटपटूंना घर बसल्या पाकच्या माजी क्रिकेटपटूंकडून ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. पाक क्रिकेट मंडळातर्फे आयोजित केलेल्या या योजनातंर्गत कार्यक्रमात माजी कर्णधार वासीम अक्रम आणि बाबर आझम यांनी पाक महिला क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे.
पाकमधील सुमारे 35 महिला क्रिकेटपटूंना क्रिकेट संदर्भात मार्गदर्शन तसेच महत्त्वाच्या टीप्स् व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वासीम अक्रम आणि बाबर आझम देत आहेत. पाकतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार तसेच आयसीसीचा हॉल ऑफ फेम पुरस्कार मिळविणाऱया वासीम अक्रमने सोमवारी आपल्या देशातील महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या वैयक्तिक अठरा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीतील अनुभवांची माहिती दिली. त्याचप्रमाणे पाक संघाला टी-20 च्या आयसीसीच्या मानांकनात अग्रस्थान मिळवून देणाऱया बाबर आझमने पाकच्या महिला क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले. आयसीसीच्या वनडे मानांकनात पाकचा संघ सध्या तिसऱया स्थानावर असून कसोटी मानांकनात पाचव्या स्थानावर आहे. अक्रम आणि बाबर आझम यांच्या मार्गदर्शनामुळे पाकच्या महिला क्रिकेटपटूंना अधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पाकच्या राष्ट्रीय महिला निवड समिती अध्यक्षा उरोज मुमताजने व्यक्त केला.