वृत्तसंस्था/ अबु धाबी
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाने सलग 3 सामने जिंकत आपला फॉर्म दाखवून दिला. आता मंगळवारी दुबळय़ा नामिबियाविरुद्ध लढतीदरम्यान पाक संघाचे लक्ष सेमीफायनलमधील स्थान निश्चित करण्यावर असेल. हा सामना मंगळवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
यंदा विश्वचषकात पाक संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का दिल्याने त्यांचे मनोबल अर्थातच उंचावले. भारताला पराभूत केल्यानंतर पाक संघाने दुसऱया सामन्यात न्यूझीलंडलाही दणका दिला. या दोन सामन्यांच्या तुलनेत पाक संघाला अफगाणवर विजय मिळविण्यासाठी 19 व्या षटकापर्यंत झगडावे लागले. आता प्राथमिक गटातील त्यांचे दोन सामने बाकी आहेत. स्कॉटलंड आणि नामिबिया या दोन्ही संघांना पराभूत करत पाकचा संघ पुढील टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.
पाक संघातील जवळपास सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असल्याचे जाणवते. कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, असिफ अली, मोहम्मद हाफीज यांची फलंदाजी बहरत आहे. शाहिन आफ्रिदी, हॅरिस रॉफ, सर्फराज अहमद, शदाब खान हे पाक संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. नामिबिया संघाला आम्ही कमी लेखत नसल्याचे कर्णधार आझमने म्हटले आहे.
इरासमुसच्या नेतृत्वाखाली नामिबिया संघाला अफगाणकडून पराभव पत्करावा लागला या स्पर्धेत नामिबियाने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडवर विजय मिळविला होता. आयसीसीच्या या स्पर्धेत सुपर 12 संघांमध्ये स्थान मिळविण्याचा पराक्रम नामिबियाने केला आहे. या स्पर्धेत प्रथमच पात्र ठरलेला नामिबियाचा संघ आपल्या उर्वरित सामन्यात दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न करेल.