कणकवली पोलिसांची तळेरेत कामगिरी : गोव्यातील कार चालकावर गुन्हा
कणकवली:
गोव्याहून मुंबईच्या दिशेने सुरू असलेली गोवा बनावटीची दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी रोखली. ही कारवाई महामार्गावर तळेरे येथे शुक्रवारी उत्तररात्री दोनच्या सुमारास करण्यात आली. 1 लाख 42 हजार 80 रुपयांची दारू तसेच वॅगनर कार पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी कार चालक सचिन प्रभाकर वेलीप (30, रा. दक्षिण गोवा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरून दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती कॉन्स्टेबल संदेश आबिटकर यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, कॉन्स्टेबल रुपेश गुरव, आबिटकर यांनी खासगी वाहनाने तळेरे गाठले. तेथे पोलीस महामार्गालगत अंधारात थांबलेले असताना रात्री दोनच्या सुमारास वॅगनर कार (जीए 09 डी 2020) मुंबईच्या दिशेने जाताना त्यांना दिसली. पोलिसांनी कार थांबविण्याचा इशारा केला. पण, कार भरधाव वेगाने पुढे गेली.
पोलिसांनी कारचा पाठलाग केला. त्यावेळी कार चालकाने कार तळेरे बसस्थानकाच्या मागे अंधारात थांबविली. पोलिसांनी तेथे जात कार चालक सचिन वेलीप याला पकडले. पुढे कारची तपासणी केली असता, आतमध्ये गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स आढळून आले. जप्त दारूमध्ये 1 लाख 42 हजार 80 रुपये किमतीच्या हनीगाईड ब्रँडी असे लेबल असलेल्या 180 मिलीच्या 1 हजार 776 बाटल्यांचा समावेश आहे.
कार चालक सचिन वेलीप याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कारवाईची फिर्याद कॉन्स्टेबल आबिटकर यांनी दिली. त्यानुसार कार चालक सचिन वेलीप याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.