कोल्हापूर/ प्रतिनिधी
14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱया युद्धात हुतात्मा झालेल्या शूर मराठावीरांना अभिवादन करण्यासाठी पानिपत येथील रोड मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी 14 जानेवारी हा शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत आणि रोड समाजाचे नेते वीरेंद्र मराठा यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार 14 जानेवारी शौर्यदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदा हा कार्यक्रम पानिपतजवळील बस्ताडा येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातून मिलिंद पाटील, राजू पाटील, सतीश जाधव, ओंकार चीर्गुटे आदींसह शिवप्रेमी रवाना झाले आहेत.
कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ वसंतराव मोरे यांच्या 10 वर्षाच्या संशोधनातून पानिपतमधील रोड समाजाला मराठा म्हणून ओळख मिळाली. 2003 पासून पानिपत येथील रोड मराठा समाजाचे नेते वीरेंद्र मराठा यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्या वतीने आयोजित 14 जानेवारी हा दिन पानिपतच्या युद्धात हुतात्मा झालेल्या मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ शौर्य दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातून शिवप्रेमी पानिपतला जात असतात. शौर्यदिनी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कर्नाल येथून रथ यात्रा निघते व ती कार्यक्रम स्थळी विसर्जित होऊन त्याचे सभेत रूपांतर होते. यंदाचा कार्यक्रम पानिपत जवळील शौर्य भूमी बस्ताड या ठिकाणी होत असून महाराष्ट्रातील 30 जिल्यातील व 17 राज्यातील मराठा बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे मुख्य राज्य संघटक मिलिंद पाटील यांनी दिली.