ऑनलाईन टीम / पुणे :
पानिपत हा विषय वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असून तो पराभवाचा नव्हे तर आपल्या शौर्याचा विषय आहे असे प्रतिपादन आशुतोष गोवारीकर यांनी केले.
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत चित्रपटाच्या माध्यमातून मराठ्यांचा पराक्रमाचा इतिहास मांडल्याबद्दल राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, सभागृह नेते धीरज घाटे आणि संस्थेचे अध्यक्ष अंकित काणे उपास्थित होते.
पानिपत चा इतिहास खूप मोठा आहे. त्या युद्धाकडे पराभव म्हणून न पाहता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. हा विषय चेष्टेचा नसून ती मराठ्यांची शौर्यगाथा आहे. त्यामुळे या शौर्यगाथेचा शालेय अभ्यासक्रमात देखील सहभाग होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा यावेळेस गोवारीकर यांनी व्यक्त केली.
हरियाणा, राजस्थान मध्ये या चित्रपाटवर घातल्या गेलेल्या बंदीवर गोवारीकर यांनी नाराजी व्यक्त केली.
पानिपत हा चित्रपट पैशांसाठी नाही तर या लढाईबद्दल पसरलेली पराभवाची छटा मला घालवायची होती. त्यासाठी हा चित्रपट बनवला असल्याचे गोवारीकर यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी चारुदत्त आफळे यांचे पानिपत विषयावर व्याख्यान झाले.