सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी पालिकेला स्वच्छता अभियानात केलेल्या कामामुळे अडीच कोटी रुपये शासनाकडुन प्रोत्साहनपर अनुदान मिळाले होते. या अनुदानातुन काही कामे करण्यात आली आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. नगरपालिकेने ९ लाख रुपयांच्या बोटीही खरेदी केल्या. मात्र नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छताविषयक दौऱ्यावर १२ लाख रुपये खर्च केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. इंदौर मध्यप्रदेशात हा दौरा जानेवारी २०२० मध्ये झाला. त्यात सत्ताधारी, विरोधी नगरसेवक आणि पालिका कर्मचारी मिळुन ४० जण सहभागी झाले होते. शहरात स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यासाठी हा दौरा होता, असे सांगण्यात आले. स्वच्छता अभियानातून मिळालेला निधी कुठे खर्च केला, असा सवाल नगराध्यक्ष संजु परब यांना विचारला असता त्यांनी आरोग्य विभागाला खर्चाची आकडेवारी सादर करण्यास सांगितली. त्यात दौऱ्याच्या खर्चाची आकडेवारी स्पष्ट झाली. दौऱ्यावर ज्यादा खर्च झाला असे वाटत नाही काय, असे परब यांना विचारले असता या दौऱ्यात मी नव्हतो. मी आजारी होतो. याबाबत शिवसेना गटनेत्या आनारोजिन लोबो यांना विचारा, असे सांगितले.